
नाशिकः
पंचवटी येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एमबीए) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाशिक महानगरपालिका लोकनेते पंडितराव खैरे विभागीय कार्यालय पंचवटी येथील स्मार्ट सिटी कार्यालयास क्षेत्र भेट देत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेतली.
महाभयंकर कोरोना महामारीत ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी हा फक्त परीक्षा केंद्रित झालेला असून त्याचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकरीता नवनवीन उपक्रम राबविण्यात यावे याबाबतचे मार्गदर्शन संस्थेचे समन्वयक माजी शिक्षक आमदार व नवनिर्वाचित आधिसभा सदस्य डॉ. अपूर्व हिरे वेळोवेळी विद्यार्थ्यांना करत असतात त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी योजनेत राबविण्यात येत असलेल्या सर्व प्रकल्पांबाबत कार्य कसे चालते. त्यांचे मॅनेजमेंट कसे केले जाते. कोण कोणत्या योजना राबविल्या जातात याबाबत ची माहिती मिळावी म्हणून सदर क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती
नासिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड च्यावतीने माननीय सीईओ साहेबांचे कार्यकारी सहाय्यक श्रीयुत निलेश बर्डे यांनी विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. भविष्याच्या दृष्टीने नाशिकचा विकास करण्याकरिता वैश्विक शाश्वत विकासाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या धर्तीवर 24 निर्देशक केंद्र सरकारने ठरवून दिले आहेत. त्यांना अनुसरून आणि नाशिकच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन, उपलब्ध संसाधनांचा वापर करून विकासाचे काम सुरू आहे. या व्यतिरिक्त देशभरातील १०० स्मार्ट शहरांच्या मूल्यांकनासाठी केंद्र सरकारने पोर्टल विकसित केले आहे. याद्वारे सर्व स्मार्ट शहरांच्या मूल्यांकनासंदर्भात एक सूत्रबद्ध यंत्रणा बनविण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पूर्ण झालेले प्रकल्प, निविदा प्रक्रियेत असलेले प्रकल्प, तसेच संबंधित स्मार्ट शहरांनी प्राप्त निधीपैकी खर्च केलेला निधी आदी निकषांच्या आधारे स्मार्ट शहरांचे मूल्यांकन केले जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीचे प्रकल्प जसे की गोदा पार्क, स्मार्ट पार्किंग प्रोजेक्ट, सिटी बस सर्विसेस, पब्लिक बाइसिकल शेअरिंग, सीसीटीव्ही सर्वेलान्स आणि सुरक्षित नाशिक याबाबत माहिती देत असताना येणाऱ्या तांत्रिक बाबींचा देखील श्रीयुत बर्डे सर यांनी उल्लेख केला त्यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नादाखल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ग्रास कॉस्ट कंट्रोल मॉडेल, एक्सक्रो अकाउंट, टाऊन प्लँनिंग, मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्ट, विदयुत व जल व्यवस्थापन आदींबाबत देखील इथंभूत महिती दिली.
कार्यक्रमाच्या सरतेशेवटी श्री निलेश यांनी राहणीमान सुलभता निर्देशांक सर्वेक्षण २०२२ बाबत माहिती देऊन, नाशिककर या नात्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्व्हेक्षणत सहभागी होऊन नाशिक बाबत आपले मत मांडावे असे देखील सांगितले. संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. गणेश तेलतुंबडे, शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. जयश्री भालेराव यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.