कोल्हापूर (जिमाका) : शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित केलेल्या शेतकरी जनसंवाद मेळाव्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, जयसिंगपूर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
जयसिंगपूर नगरीत आपले स्वागत ज्या पद्धतीने झाले त्यांने आपण भारावून गेलो असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे सरकार सर्वसामान्यांचे असून केवळ घोषणा न करता मदत करण्याची भूमिका शासनाने स्वीकारली आहे. गेल्या चार महिन्यात सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या विकासात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला वेगळी आपुलकी असल्यानेच त्यांच्या विकासासाठी यापुढे निर्णय घेतले जातील. आमच्या शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत, गोगलगायमुळे नुकसान झालेल्या पिकांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेसात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले असून अजूनही पंचनामे सुरु आहेत. पंचनाम्यानंतर या शेतकऱ्यांनाही सरकार मदत करणार असून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मीही एक शेतकरी असून शेतकऱ्यांच्या कष्टाची, श्रमाची जाणीव असल्याने यावर्षीची दिवाळी शेतकऱ्यांसमवेत साजरी केली. लोकांमध्ये जाऊन त्यांची सुख दु:खे समजून घेण्यास आपणास आवडते. सर्वसामान्यांच्या मनात सरकार आपले आहे, अशी भावना निर्माण झाली ही आमच्या सरकारच्या कामाची पोचपावती आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
महापुरुषांचे विचार आणि स्मारके ही आपली स्फूर्तिस्थाने असून जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभा राहत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. जयसिंगपूर आणि अन्य नगरपालिकांच्या विकासासाठी नगरविकासच्या माध्यमातून विकास कामांना आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शिरोळ तालुक्यात अल्पसंख्याकांचा मोठा समुदाय आहे. या समुदायाला आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 25 कोटींचा निधी दिला जाईल. शिरोळ नगरपालिकेसाठी नवीन इमारत बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच इमारतीच्या जागेबाबतचा प्रश्नही मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली.
शिरोळ तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शिरोळ तालुक्यात नवीन एमआयडीसी सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमात बोलताना केले.
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा करण्याचे काम सुरू असून शिरोळ तालुक्यातील विकासकामांचा रथ पुढे नेण्यासाठी आवश्यक मदत व्हावी, अशी अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली.
आमदार श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यात बागायती क्षेत्र मोठे आहे. येथील शेतकरी हा कष्टकरी आहे. स्वतःच्या कष्टावर शेती पिकवतो. ऊस, भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. शेतीचे क्षेत्र कमी होत असल्याने येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी नवीन एमआयडीसी लवकर सुरु व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिरोळ तालुक्यात चार नद्या वाहत आहेत. तालुक्यात पुराचा प्रश्न मोठा असून पूरग्रस्तांना निवारा शेड उभारणीसाठी अनुमती मिळावी अशी मागणी त्यांनी केली. या बरोबरच तालुक्यात पर्यटन विकास व्हावा, दत्त मंदिर व कोपेश्वर मंदिर विकासासाठी विशेष निधी मिळावा. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न, पंचगंगा नदी प्रदूषण, तालुक्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या योजनांसाठी भरीव निधी मिळावा अशी मागणी आमदार श्री. पाटील- यड्रावकर यांनी केली.
कार्यक्रमात जयसिंगपूर शहरातील नियमित केलेल्या झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचे प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.