मुंबई उपनगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करीता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत. 26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांनी आज 153- दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची माहिती घेतली.
श्री. भदोरिया यांनी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना लोकसभा निवडणूक नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी या कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय आणि सांघिक प्रयत्नाने काम करावे. मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी, मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या सुविधा पुरविल्या जातील, याबाबतची दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी श्री. भदोरिया यांनी दिल्या. या भेटीदरम्यान श्री. भदोरिया यांनी 153-दहिसर विधानसभा मतदार संघातील स्ट्रॉंग रूम तसेच रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली.