नाशिक :मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने प्रज्ञा (PRADNYA- Centre for Promotion, Research and Awareness of Intellectual Property) या बौद्धिक संपदा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान दिवस, 28 फेब्रुवारी या दिवशी करण्यात आले. मविप्रच्या सर्व शाखांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना त्यांच्या बौद्धिक संपदा संरक्षित करण्यास मदत करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा हक्कांबाबत सजग करणे आणि त्यांच्या बौद्धिक संपदा संरक्षित करण्यास मदत करणे हे या केंद्राचे काम आहे. मविप्रच्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक संपदा संरक्षित करण्यासाठी येणाऱ्या खर्चातील अर्धा वाटा मविप्र संस्था उचलते. तसेच पेटंट ड्राफ्टिंग या केंद्रातर्फे मोफत केले जाते.
प्रज्ञा केंद्र आपल्या सेवांचा लाभ मविप्र बाहेरील इतर शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, प्राध्यापक, शेती व्यवसायिक आणि इतर औद्योगिक क्षेत्राला देखील करून देण्यास कटिबद्ध आहे. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत दि.२९ एप्रिल रोजी मविप्रने नाशिक इंजिनियरिंग क्लस्टरच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरबरोबर सामंजस्य करार केला आहे. नाशिक इंजिनियरिंग क्लस्टर ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक नीती आणि संवर्धन विभागाने ‘इंडस्रियल इंफ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन स्कीम’ अंतर्गत स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेच्या इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेण्टरचा लाभ राज्यातील अनेक तरुण उदयोन्मुख व्यवसायीक आणि स्टार्टअप्स घेत आहेत. तेथील उद्योजकांना बौद्धिक संपदांबाबत प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या बौद्धिक संपदांचे संरक्षण करणे हे काम इथून पुढे प्रज्ञा केंद्र करणार आहे. तसेच मविप्रच्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संकल्पना आणि संशोधनाला सत्यात आणण्यास नाशिक इंजिनियरिंग क्लस्टर मदत करणार आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, आणि नाशिक इंजिनियरिंग क्लस्टरचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री एस के माथुर यांनी आज इथे या सामंजस्य करारावर सह्या केल्या. या वेळी प्रज्ञा केंद्राच्या समन्वयक डॉ.मृदुला बेळे, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेयरमन श्री मनिष कोठारी व संचालक श्री.नरेंद्र बिरारी तसेच इन्क्युबेशन सेंटरचे श्री.निखिल कुलकर्णी उपस्थित होते. नाशिकमधिल या दोन महत्वाच्या संस्थांमधिल सामंजस्य करार हे दोन्ही संस्थातील सहभागी घटकांच्या संशोधनांचे संरक्षण करणे आणि त्यांना सत्यात उतरवण्यास मदत करण्यासाठी अतिशय मोलाचा ठरेल, असे मत याप्रसंगी अॅड.नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. या वाटचालीस मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल,संचालक मंडळ व शिक्षणाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Like this:
Like Loading...