नागपूर : स्वराज्याच्या निर्मितीत प्राणांची आहुती देणारे शुरवीर, महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा आणि देशभक्तीपर गितांवर उत्तम नृत्याविस्कारातून शालेय विद्यार्थ्यांनी गौरवशाली शौर्याचा इतिहास जागविला, औचित्य ठरले महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापनदिनाचे.
येथील वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार, उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड, विज्ञान पर्यवेक्षक जयेश वाकुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हजारो सैनिकांचा ताफ्यासहित स्वराज्यावर पुन्हा चाल करुन आलेला आदिलशाहीचा सरदार बहलोल खान आणि त्याचा निकराने सामना करणारे प्रतापराव गुजर हा प्रसंग कथन करुन नेसरीच्या ऐतिहासिक लढाईत वीर मरण आलेल्या प्रतापराव गुजरांसहीत आणखी सहा वीरांच्या शौर्यांवर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या गितावरील दक्षिण अंबाझरी येथील मुंडले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी सादर केलेला नृत्याविस्कार उपस्थितांच्या दाद मिळवून गेला. यासोबतच कोंडाळी येथील लखोटिया भुतळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हे कण कण मे जाना’, शिशु ज्ञानमंदीर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘मै इतिहास का आयना हु’, नयापुरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘तेरी मिट्टी मे मिल जावा’, सेंट पॉल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘लल्लाटी भंडार’, सुदर्शन हायस्कूल इतवारीच्या विद्यार्थ्यांनी ‘माय भवानी’ अशा उत्तमोत्त्म नृत्याविस्काराचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या एकूण अकरा शाळांच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले.
पहिल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक जांबोरी आयोजनात नागपूर जिल्हा पथकाचे नैतृत्व करणारे सावनेर तालुक्यातील टाकडी येथील भन्साळी बुनियादी विद्यामंदीराचे स्काऊट मास्टर प्रितम टेकाडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन एस.सी.एस. गर्ल्स ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. शालिनी तेलरांधे यांनी केले तर उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड यांनी आभार मानले.