पुणे:
आज पूजा कोल्हे या घरी आल्या होत्या.अतिशय शांत, नम्र आणि तब्येतीने नाजूक दिसणाऱ्या, खूप आदराने बोलणाऱ्या पूजा शेतात दिवसभर कष्ट करतात आणि शेती विषयक नवीन नवीन प्रयोग करतात हे ऐकून खूप छान वाटलं.माझ्याशी फोनवर नेहेमीच संपर्कात असणाऱ्या पूजा शेती बाबत आपले अनेक अनुभव सांगत असतात.त्यांचे हा प्रवास महिला साठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
समाज सेवेचा वारसा लाभलेल्या कुटुंबात सौ पुजा यांचं लग्न झालं.अत्यंत दुर्गम अश्या आदिवासी भागात अर्थात धारणी मेळघाट भागात आजन्म आपली वैद्यकीय सेवा देण्याचे व्रत घेतलेले डॉ.रवींद्र कोल्हे आणि त्यांच्या पत्नी स्मिता ताई कोल्हे. आपलं संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी अर्पण करणारं हे आदर्श दाम्पत्य आणि त्यांच्या मोठ्या सूनबाई म्हणजे सौ.पूजा रोहित कोल्हे.
अकोला जिल्ह्यातील सगद हे सौ पूजा यांचं मुळ गाव आहे.थोड्या कमी वयातच लग्न झालं आणि अत्यंत सेवाभावी कुटुंबात सौ पूजा यांचा प्रवेश झाला.पुजाचे पती श्री रोहित रवींद्र कोल्हे हे वयाच्या तेराव्या वर्षी पासूनच शेतीकामात ते प्रवीण होते आणि, मेळघाट येथील कोळूपुअर या इतक्या दुर्गम दगड धोंडी भागात ते अत्यंत आधुनिक आणि यशस्वी प्रयोग पद्धतीने ते शेती करत होते. परंतु सौ पूजा यांना या कामाचा काहीच अनुभव आणि माहीत देखील नव्हती.सुरवातीला श्री रोहित यांच्या सोबत फक्त शेतात जायचं आणि जमेल ते करून परत यायचं अशी सुरूवात झाली.हळूहळू सौ पूजा यांची शेती मध्ये रुची वाढू लागली. त्यांचे पती श्री रोहित यांनी आपल्या कामात पूजा यांना बरोबरीचे स्थान देऊन शेती काम समजून घेण्यास आणि नवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहन दिले. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पण प्रत्यक्ष शेती काम सुरू केलं.स्वतः रात्र दिवस शेतात राबून त्यांनी शेतीच्या आधुनिक पद्धतीचा अभ्यास सुरू केला.आणि आपल्या पतीला साथ देत त्यांनी अनेक शेती प्रयोग यशस्वी करून दाखवले. कडक उन्हाळ्यात टरबूज, खरबुज चे उदंड पीक घेण्यात त्यांची मेहनत सफल झाली आहे.
देश परदेशातून येणारे पाहुणे,घर,शेती असे समीकरण सौ पूजा सक्षम पणे सांभाळत आहेत. आपल्या दोन लहान मुलांचे संगोपन पण त्या उत्तम प्रकारे करत आहेत.
समाज सेवा व्रत घेतलेल्या कुटुंबात सौ.पूजा या सून म्हणून आपली जवाबदारी उत्तमपणे निभावत आहेत. तसेच शेती कामाचा काहीच अनुभव नसताना अत्यंत विपरीत परिस्थितीत अर्थात ते मेळघाट कोळूपुअर हे गाव खूप अतल्या भागात आहे आणि शेतात त्याचं घर आहे तो भाग पण एकट आहे.अस्वल,कोल्हे सारख्या जंगली जनावरांची ये जा असते.अश्या ठिकाणी हिमतीने लहान दोन मुले घेऊन श्री रोहित कोल्हे आणि सौ पूजा कोल्हे हे दांपत्य शेती करून गावातील आदिवासी महिला व मुलींना रोजगार उपलब्ध करून देत असून त्याच बरोबर रोजगाराच्या नवीन संधी पण निर्माण करून देत आहेत. स्वतः शेतीत कष्ट करून सौ.पूजा यांनी आधुनिक पद्धतीने शेती करणारी महिला शेतकरी म्हणून आपली ओळख तर निर्माण केली च आहे त्याच बरोबर त्या गावातील इतर आदिवासी महिला व मुलींना पुढे येण्यास आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यास देखील प्रेरणा ठरत आहेत.
अश्या या आधुनिक महिला शेतकरी
सौ पूजा रोहित कोल्हे यांना आणि यांच्या अद्भुत कार्याला मानाचा सलाम.
डॉ.राणी दुष्यंत खेडीकर
अध्यक्ष
बाल कल्याण समिती पुणे भाग एक