सातारा – ॲड. सुचित्रा घोगरे-काटकर यांची महाराष्ट्र शासनाच्या सातारा जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूकीची यादी शासन राजपत्रात अधिसूचनेद्वारे जाहीर केली आहे. जिल्हा बाल कल्याण समितीमार्फत १८ वर्ष वयाखालील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या सर्वागीण विकास, पुर्नवसन आणि सर्वच स्तरावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी -बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी-१ म्हणून प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हास्तरावर काम पाहते. दर तीन वर्षानी कार्यकाळ संपल्यावर नवीन समिती गठीत करण्यात येते. राज्य शासनातर्फे नेमण्यात आलेल्या मा.उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय मंडळामार्फत मुलाखत व परीक्षा घेऊन कायद्यातील तरतुदीनुसार समिती सदस्याची नियुक्ती केली जाते..
राज्यशासनाने सातारा जिल्ह्याच्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून ॲड. सुचित्रा घोगरे-काटकर, सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ. दिपक रामचंद्र राऊत, ॲड. स्वरुपा प्रशांत पोरे, ॲड. जयदिप रंगराव पाटील, ॲड. शितल अमोल लोखंडे यांची नियुक्ती केली आहे.