कर्मवीर ॲड.बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात टेलिस्कोप तयार करण्याची कार्यशाळा संपन्न..
नाशिक दि ३ : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक व इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी व ॲस्ट्रोपिजिक्स (आयुका )पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक येथे दोन दिवशीय टेलिस्कोप मेकिंग कार्यशाळा संपन्न झाली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे व पदाधिकारी, कार्यकारी मंडळाच्या संकल्पनेतून, विचारधारेतून व दूरदृष्टीतून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमान अंतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवड निर्माण व्हावी या दृष्टीने खगोलशास्त्र, व आकाश नोंदी या संबंधित देशातील अग्रगण्य संस्था आयुका यांच्याबरोबर केलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत दोन दिवशीय टेलिस्कोप तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.सतिश देवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागे मराठा विद्या प्रसारक समाजाची भूमिका, विद्यार्थ्यांमध्ये छंद जोपासण्यासाठी व विज्ञानाची आवड तयार होण्याच्या दृष्टीने आणि समाजामध्ये या विषयाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने सदर कार्यशाळेचे महत्व अधोरेखित केले. सदर कार्यशाळेसाठी आयुका, पुणे येथील विशेष प्रशिक्षक म्हणून श्री तुषार पुरोहित, श्री महारुद्र मते व श्री प्रसाद आडेकर यांनी ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रो फिजिक्स या विषयांची ओळख, दुर्बिणीचा शोध निर्मिती, ऐतिहासिक कालखंडानुसार झालेले बदल, देशांतर्गत पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर या क्षेत्रामध्ये झालेले बदल क्रांती आणि संशोधन याबद्दल प्रथमतः सर्व सहभागींना मार्गदर्शन केले. यानंतरच्या सत्रामध्ये दुर्बीण तयार करण्यासंदर्भात आवश्यक असणाऱ्या साहित्य, प्रमाण निहाय दुर्बीण तयार करण्याचे विविध सूत्र, यातूनच एकत्रितपणे स्वतः प्रशिक्षणार्थी यांनी प्रत्यक्षपणे टेलिस्कोप बनविण्याचे कार्यशाळे अंतर्गत प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींनी बनवलेल्या दुर्बिणी मधून आकाश निरीक्षण रात्रीच्या वेळी शिकविण्यात आले. यामध्ये आकाश दर्शन करत असताना प्रत्यक्ष असणाऱ्या स्थानापासून विविध ग्रहांचे राशींचे अथवा आकाशामध्ये निरनिराळ्या तार्यांचे स्थान कसे शोधावे हे प्रत्यक्षपणे व सॉफ्टवेअरच्या साह्याने समजावून सांगण्यात आले.
दुसऱ्या दिवसाच्या सत्रा मध्ये विविध खगोलशास्त्रीय घटना, आकाश निरीक्षणांमधून, व भौगोलिक घटनांमधून निरीक्षणे आणि ज्ञान अवगत करण्याचे प्रशिक्षण विविध उदाहरणांच्या सहाय्याने देण्यात आले. याबरोबरच ॲस्ट्रो फिजिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातून असणाऱ्या संधी आणि भवितव्य याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना असणाऱ्या विविध प्रश्नांचे प्रत्यक्षपणे समाधान करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमांमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी सदर कार्यशाळेच्या आयोजनप्रसंगी संस्थेच्या ध्येयधोरणांमध्ये विज्ञानाधिष्ठित विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, शिक्षकांच्या गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थी व समाजापर्यंत आधुनिक ज्ञानाची कास पोहोचविण्याचे धोरण याअंतर्गत आयुका, आईसर व इतर अनेक प्रशिक्षण संस्थांचे मराठा विद्या प्रसारक समाजाचे सामंजस्य करार करून त्या अंतर्गत विविध उपक्रमांतून शिक्षकांची व विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी मविप्र समाजातील शाखांबरोबरच जिल्ह्यातील इतरही शाखा आणि विद्यार्थ्यांपर्यंत सदर उपक्रम पोहोचवावा, प्रत्येक शाळेमध्ये याबाबत कार्यशाळांचे आयोजन करावे, प्रत्येक शाळेच्या छतावर किमान एक दुर्बीण असावी आणि त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे ज्ञान व गोडी निर्माण करावी आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा यासंबंधीचे आवाहन केले. तसेच यापुढेही संस्थेद्वारे सामंजस्य कराराअंतर्गत कार्यशाळांचे आयोजन केले जातील. शहरी ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना यासंबंधीचे प्रशिक्षण ज्ञान पोहोचविण्यासाठी संस्थेअंतर्गत प्रशिक्षणार्थी टीमचे कार्य विभाजन करून या प्रकारच्या दुर्बीण सर्वत्र उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असेल . याप्रसंगी प्रशिक्षणार्थींचे आणि आयोजकांचेही अभिनंदन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका मंडलिक मॅडम यांनी या विषयाच्या संदर्भामध्ये मराठी मधील असणाऱ्या मराठी पुस्तकांबद्दलची माहिती उपस्थितांना करून दिली. प्राचार्य डॉ सतिश देवणे यांनी उपस्थित मान्यवर यांचे स्वागत केले. याप्रसंगी संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.नितीन जाधव उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींसोबत संवाद साधला व मार्गदर्शन केले. माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांनी सदर कार्यशाळेच्या आयोजनामागे विज्ञानाप्रती विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विषय संकल्पना रुजविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या संबंधित भूमिका स्पष्ट केली. संस्थेच्या प्रत्येक शाळा,महाविद्यालय याबरोबरच इतरही शाळा महाविद्यालय आणि समाजातील इतर घटकांमध्ये या प्रकारच्या ज्ञानाची आवड तयार करून वैज्ञानिक दृष्टिकोन जपला जावा असा मानस व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असेच नाविन्यूर्ण उपक्रमांचे आयोजन संस्था स्तरावरून यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी सर्वांचे आभार मानून प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.नाठे यांनी भूमिका पार पाडली.