घरोघरी पोहोचू द्या मतदानाचा संदेश – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांमधून प्रभात फेरीचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि.३ :- मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमधून दि. १० या एकाच दिवशी व एकाच वेळी सकाळी ७ ते ८ या वेळेत प्रभात फेरीचे आयोजन करावे. तसेच मतदानाची गुढी उभारुन गावागावातून मतदानाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषवाक्याच्या माध्यमातून जाणीव जागृती करुन घरोघरी मतदानाचा संदेश पोहोचवा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक एम. के. देशमुख यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय ‘स्वीप’ कक्षात नियुक्त अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, दि.१० एप्रिल रोजी सर्व शाळांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून मतदार जागृतीचा संदेश द्यावा. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व सांगणारा मजकूर हस्ताक्षर स्पर्धेसाठी देण्यात यावा. स्पर्धेत प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दि.१ मे यादिवशी पारितोषिक वितरण करण्यात यावे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना एक पत्र वाचून दाखवावे व यामध्ये मतदान करण्याविषयीचे आवाहन असावे. दि.१ मे रोजी शालेय निकालपत्रा सोबत हे पत्र वितरीत करावे. हे पत्र विद्यार्थीनी घरी पालकांना वाचून दाखवावे. महिला बचत गटांची मदत घेवून महिला मतदारांचे प्रमाण वाढवण्यासाठी काम करावे. अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शिक्षक असे शासन यंत्रणेचे काम करणारे सर्व घटक यांना आवाहन करण्यात यावे.
शहरातील मोठ्या महाविद्यालयांमध्ये मतदान जाणीव जागृती विषयी मोक्याच्या जागी बॅनर्स लावावे. लोकशाहीच्या महत्त्व विषयी विविध तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे.बचत गटांनी गाव, तालुका. जिल्हास्तरावर महिलांच्या माध्यमातुन मतदानाचे जागृती करावी. गुढीपाडवा, ईद यासारख्या विविध सणांच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना लोकांना मतदानाचे महत्त्व सांगावे व लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.