जळगाव जिल्ह्यातील सहाय्यकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाची मान्यता प्रदान
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
मतदान केंद्राच्या संख्येत १८ ने वाढ; आता जिल्ह्यात ३५८२ मतदान केंद्र
जळगाव दि.29 :- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सहाय्यकारी मतदान केंद्रांच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता, त्यानुसार ज्या मतदान केंद्रास जोडलेल्या मतदारांची संख्या १५०० पेक्षा अधिक होती तिथे सहाय्यकारी (अतिरिक्त) नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले. तसेच मतदान केंद्राच्या ज्या इमारती नादुरुस्त होत्या किंवा त्यांची पडझड झाली होती. अशा मतदान केंद्राऐवजी नवीन मतदान केंद्र प्रस्तावित केले होते. प्रस्तावित यादीवर नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या होत्या व सदर बदलाबाबत राजकीय पक्षांची बैठकदेखील आयोजित करण्यात आली होती. मुदतीत कुठलीही हरकत प्राप्त न झाल्याने हे प्रस्ताव मंजुरीकामी भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांना जोडलेल्या मतदारांची संख्या १५०० पेक्षा अधिक झाल्याने तेथे प्रस्तावित नवीन मतदान केंद्रामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या संख्येत आता १८ ने वाढ होऊन एकूण मतदान केंद्रांची संख्या ३५८२ इतकी झालेली आहे. तर जुन्या व नादुरुस्त इमारती असलेल्या ४७ मतदान केंद्रांची इमारत बदलण्यात आलेली आहे.
या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.