छत्रपती संभाजीनगर, दि.२७ :- लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. तथापि, ही कारवाई करतांना महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील सर्व उपविभागीय,तहसील कार्यालयातील, पोलीस स्टेशन मधील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, कायद्याने दिलेल्या अधिकाराचा सुयोग्य वापर करून कोणावरही अन्याय होईल असे वर्तन पोलीस प्रशासन किंवा महसुल दंडाधिकारी कार्यालयाकडून होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावणे आवश्यक असुन यात उपविभागीय व तालुकादंडाधिकाऱ्यांनी खात्री करणे आवश्यक आहे. कलम १४४ अंतर्गत येणाऱ्या कारवाईत तातडीने आपल्या हद्दीतील आदेश निर्गमित करण्यात यावेत. गुन्हेगारांबाबतची स्थानिक पातळीवर माहिती घेण्यात यावी. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाची ही संयुक्त जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी परस्पर समन्वय राखावा. आपले कर्तव्य बजावण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत निर्दोष पद्धतीने कामकाज पार पाडण्यासाठी संवाद आणि समन्वय सर्व यंत्रणेत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.