सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
हिंगोली येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
विविध विकासकामांचे लोकार्पण; आतापर्यंत ५ कोटींवर लोकांना मिळाला लाभ
हिंगोली दि. 10 : हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची श्रृंखला उभारून या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येईल. सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करण्यासाठी आमचे शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
हिंगोली येथील रामलीला मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या योजनांचे हजारो लाभार्थी व जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत 5 कोटींवर लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ योजनेतून विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध विभागांच्या शासकीय योजनांमधील 14 लक्ष 52 हजारावर लाभार्थ्यांना जिल्ह्यामध्ये लाभ मिळाला आहे. हा लाभ 774 कोटी रुपयांचा असून, आज या कार्यक्रमाला लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, सर्वश्री आ. विप्लव बाजोरिया, तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हिंगोलीच्या सिंचनाच्या अनुशेषावर भर देण्यात येऊन जिल्ह्यात सिंचनासंदर्भातील अनेक प्रयोग केले जातील. हिंगोलीला रोजगार देण्याच्या दृष्टीने सिंचनाच्या माध्यमातून औद्योगिक विकास साधला जाईल. पूर्णा नदीवर बंधारे व्हावेत, यासाठी यापूर्वी आंदोलने झालीत. मात्र हे शासन आल्यावर बंधारे बांधण्याचे काम पूर्ण करीत आहोत, ज्यातून 20 हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात कयाधू नदीला कालव्याद्वारे जोडले जाणार आहे. लवकरच हा प्रकल्प हाती घेतला जाईल. पैनगंगा नदीवरील सात बंधारे ही पूर्ण केले जातील. त्यातून 50 हजार एकर सिंचनक्षमता निर्माण होणार आहे. हे शासन तातडीने निर्णय घेणारे शासन आहे.
गतिमान अंमलबजावणी
गेल्या दीड वर्षांमध्ये अवघ्या 55 ते 60 मंत्रिमंडळ बैठकांमध्ये 500 लोकाभिमुख निर्णय या सरकारने घेतले आहेत. हे सर्व निर्णय गोरगरीब जनता, शेतकरी व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारे आहेत. वेगवान अंमलबजावणीचे शासन म्हणून जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. 885 कोटी रुपये खर्च करून हिंगोलीला वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत आहे. हळद संशोधन केंद्रासाठी 100 कोटी निधी दिला आहे. आणखीही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आरक्षणासाठी शासनाच्या पाठीशी उभे राहा
छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा शब्द दिला होता. माझा शब्द मी पाळला आहे. मराठा समाजाला त्याचा नक्कीच लाभ होईल. पोलीस भरतीमध्येसुद्धा हे आरक्षण लागू केले आहे. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण देण्याचे काम आम्ही केले आहे. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करून विशेष अधिवेशनात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएम म्हणजे कॉमन मॅन
सामान्य कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा तुमच्यामुळे मुख्यमंत्री झाला आहे. सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे तर सीएम म्हणजे तुमच्यासारखे कॉमन मॅन असे सांगून त्यांनी हे सरकार सामान्यांतल्या सामान्यासाठी योजना आणेल व त्याची गतिशील अंमलबजावणी करेल. शासन आपल्या दारी हे त्यापैकीच एक अभियान असून, कॉमन मॅनच्या या अभियानाचे, याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे देशभर औत्सुक्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रमांमध्ये हिंगोली तालुक्याने आघाडी घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात विविध योजनांचा लाभ देण्यासाठी टीम कार्यरत असल्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.
खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी पूर्णा नदीवरील बॅरेजेसच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्र्याचे आभार मानले. उर्वरित सिंचन अनुशेष भरून काढण्याची मागणी केली. हळद संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल त्यांनी आभार मानताना उर्वरित 300 कोटी रुपये आणखी वाढविण्याची मागणी केली.
आमदार मुटकुळे यांनी यावेळी जिल्ह्यासंदर्भात विविध मागण्या सादर केल्या. पंचवीस वर्ष जिल्हा निर्मितीनंतर मागे राहिलेल्या पायाभूत सुविधा पूर्णत्वास जाव्यात, अशी विनंती केली.
आमदार संतोष बांगर यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिल्याबद्दल व सामान्य जनतेला आरोग्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून भरीव मदत केल्याबद्दल आभार मानले. तसेच सिंचनाच्या आणखी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार राजू नवघरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण, सिंचन, वीजपुरवठ्यातील अनुशेष दूर करण्याची तसेच पूर्णा बॅरेजप्रमाणे अन्य बॅरेज पूर्ण करण्याची मागणी केली.
विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन
खाकी बाबा मठ संस्थान परिसराच्या विविध विकास कामाचे भूमीपूजन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त सुरु करण्यात आलेल्या नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह व मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह हिंगोली या दोन्ही प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेच्या इमारतींसाठी 21 कोटी 29 लक्ष रुपये किमतीच्या इमारतीचे ई- लोकार्पण आणि शासकीय जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकामासाठी 7.84 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, याचेही भूमीपूजन करण्यात आले.