अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा) :- सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ, कणखर आणि सदृढ महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दृरदृष्यप्रणालीद्वारे केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महापौर सौ. रोहिणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आ.मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सुनिल साळवे, अशोक गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. त्यांचं कार्य जगासाठी दिपस्तंभ ठरेल असंच आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी, समता बंधुता यांची शिकवण देणारे अनेक धडे घालून दिले आहेत. यातूनच आपण एकजूट होणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सामाजिक न्याय विभाग हा अनुसूचित जातींसह समाजातील विविध घटकांसाठी काम करणारा विभाग आहे. समाजाच्या सर्वच घटकांचा संबंध या विभागाशी येतो. जनतेला जलद, सुलभ व्यवस्था उपलब्ध व्हावी, म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व सेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या माध्यमातून एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय भवनात येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नांची सोडवणूक होऊन त्यांचे समाधान होण्याच्यादृष्टीने या विभागाने काम करावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
सामाजिक न्याय विभागामार्फत जनतेच्या कल्याणासाठी दरवर्षी 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा खर्च शासनामार्फत करण्यात येऊन याद्वारे विविध सोयी-सवलती उपलब्ध करुन देण्यात येतात. अहमदनगर जिल्ह्यातील 657 महाविद्यालयातील सरासरी एक लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत असल्याचे समाधानही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील 442 वसतीगृहे व 90 निवासी शाळांमध्ये 61 हजार 500 विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, पी.एचडी तसेच एम. फिल साठी फेलोशिप दिली जाते. या सुविधांच्या वापरातून तरूण होतकरू विद्यार्थी, युवावर्ग आधुनिक शिक्षण प्रवाह, संशोधन यात आणि जगाच्या स्पर्धेत पुढे राहील, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सेवा पंधरवड्यामध्ये 67 हजार जात प्रमाणपत्रांची वैधता करुन देण्यात आली असुन 1 लाख 2 हजार दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. या सेवा पंधरवड्यात राज्यात अहमदनगर जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम इमारतीच्या माध्यमातून होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासामध्ये भर टाकणारी ही इमारत ठरणार आहे. शासनामार्फत जनकल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले जातात. परंतू यंत्रणांनी या निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त भारत केंद्रे यांनी केले तर प्रादेशिक उपायुक्त डॉ. भगवान वीर यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.