मुंबई : जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2022, मुंबई उपनगर जिल्हा या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई उपनगर च्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
जिल्हा सांख्यिकी कार्यालय, मुंबई उपनगर मार्फत सन 2021-22 साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक व आर्थिक बाबींसंबंधीची माहिती एकत्रित करुन जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, 2022 हे प्रकाशन तयार करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक प्रांजली वाठ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे, तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा सांख्यिकी कार्यालय, मुंबई उपनगर मार्फत जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हे वार्षिक जिल्हास्तरीय सांख्यिकी प्रकाशन प्रकाशित केले जाते. या प्रकाशनात शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वाहतूक व दळणवळण, महिला व बाल विकास इ. विविध विकास क्षेत्रे तसेच जिल्हा उत्पन्न, स्थानिक स्वराज्य संस्थाचे उत्पन्न/खर्च, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती, विविध स्त्रोतातून जमा होणारा महसूल, निवडणूक विषयक आकडेवारी, लोकसंख्या इ. सामाजिक क्षेत्रातील महत्वाच्या बाबींवरील माहितीचा या पुस्तकाचा समावेश आहे.
या प्रकाशनामध्ये एकूण 117 विषयांचा समावेश असून असून त्यातील माहिती शासकीय व निमशासकीय अशा 65 यंत्रणांकडून मागविण्यात येते. जिल्हास्तरीय योजनांचा आराखडा तयार करणे, योजनानिहाय आर्थिक व भौतिक उद्दिष्टे निश्चित करणे, जिल्ह्याच्या विविध योजना राबविणे, मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यांची निवड करणे व इतर अनेक प्रशासकीय बाबींसाठी प्रकाशनातील आकडेवारीचा उपयोग शासनास होतो.
जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2022 हे प्रकाशन मराठी मध्ये https://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.