मुंबई : अंधेरीतील गोखले उड्डाणपूल लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मंत्रालयात गोखले उड्डाणपुलासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत श्री. लोढा बोलत होते.
बैठकीस आमदार अमित साटम, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम रेल्वेकडून 3 ते 4 महिन्यांत करण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पुलाच्या प्री कास्टिंगचे काम याचदरम्यान सुरू राहिल. मे 2023 अखेरपर्यंत गोखले पुलाची किमान 1 मार्गिका (लाईन) सुरू करण्याचा विचार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे. या पुलासंदर्भात रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा व पुल देखील पूर्ण व्हावा, याकरिता प्रयत्न केले जात आहेत, असेही पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले.