ठाणे : ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस सुट्टी आहे. मात्र सुट्टीसाठी बाहेर न जाता आपण सर्वांनी 20 मे रोजी मतदान नक्की करावे तसेच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा 64 वा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज समस्त ठाणेवासियांना केले.
महाराष्ट्र दिनाच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस.स्वामी, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) श्री. संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री.विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस सुट्टी आहे. सुट्टीसाठी बाहेर न जाता आपण सर्वांनी 20 मे रोजी मतदान नक्की करावे, असेही आवाहन त्यांनी उपस्थितांना तसेच समस्त ठाणेवासियांना शेवटी केले.
ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी उघड्या जीपमधून परेड निरीक्षण केले. तसेच याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त अनिल घेरडीकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांचे दिमाखदार संचलन पार पडले.
याप्रसंगी मे. महानगर टेलिफोन निगम लि. ठाणे चे सुरक्षा रक्षक श्री. प्रल्हाद गोपाल तारी यांनी एमटीएनएल केबलची चोरी वाचविण्यात मोठी भूमिका बजावून चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचप्रमाणे मे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग वागळे इस्टेट, ठाणे चे सुरक्षा रक्षक श्री. हनुमंत य.अडसुळे यांनी वागळे इस्टेट येथील लागलेल्या आगीवर मोठ्या शिताफीने नियंत्रण मिळविले. या दोघांच्याही या विशेष कामगिरीबाबत त्यांना जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेवून त्यांना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन डॉ. तरुलता धनके यांनी केले.
Related Stories
September 24, 2024
June 17, 2024
June 17, 2024