कुर्ला वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! २० मे रोजी अवश्य मतदान करा
मुंबई उपनगर : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुर्ला- नेहरूनगर आगार येथे सूचना केंद्रातून बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे 2024 रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करा!! अशी उद्घोषणा देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सातत्याने मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची गावी जाण्याची लगबग आणि त्यात १७४ कुर्ला (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ कुर्ला- नेहरूनगर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार बस स्थानकावरील ही उदघोषणा सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती.
बस स्थानकावर साधारण दहा हजाराच्या आसपास नागरिकांची वर्दळ रोजच असते. आपल्या गावी जाण्यासाठी बसची वेळ, मार्ग आणि बस कुठे लागली आहे. याबाबत आगारच्या सूचना केंद्रामधून सर्वसामान्य प्रवाशांना सातत्याने उद्घोषणा करून मार्गदर्शन करण्यात येते. या सूचना केंद्रामधून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगार प्रमुख आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे ‘सुजाण आणि जागरूक मतदार व्हा, लोकशाहीचे रक्षण करा’ तसेच ‘मतदान’ आपली जबाबदारी आपला अधिकार, मजबूत लोकशाहीचा आधार’ अशा नावीन्यपूर्ण उद्घोषणा देऊन प्रवासी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यास नक्कीच मदत होणार आहे.
कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे- फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला नेहरूनगर आगार येथे हा उपक्रम राबविण्यात आला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे, स्वीप पथक प्रमुख सागर खुटवड, तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक थविल यांनी आगार प्रमुख आणि तेथील अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या. आगार व्यवस्थापक दीपक हेतंबे, आगार प्रमुख दीपक जाधव व वाहतूक नियंत्रक कडवईकर यांच्या समन्वयाने सूचना केंद्रातून ही उद्घोषणा करण्यात येत आहे.