लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
वृत्त विशेष: महिला मतदारांची संख्या वाढली
मुंबई, दि. ७: पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे.
२००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. तथापि, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
स्वीप अभियान
महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, ‘स्वीप’ (SVEEP-Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
एकूण मतदार
२०१९ मध्ये सेवा मतदार धरुन ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.