गुरुवार दिनांक ४ एप्रिल रोजी मविप्र समाज संचलित नर्सिंग महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेशित प्रथम वर्ष बी.एस्सी.नर्सिंग व जी.एन.एम.विद्यार्थ्यांचा दीपप्रज्वलन आणि शपथग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुलसचिव डॉ.राजेंद्र बंगाल हे प्रमुख अतिथी , सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.लोखंडे, अधिष्ठाता डॉ.सुधीर भामरे, प्राचार्या डॉ.पौर्णिमा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
नर्सिंग स्टाफ रुग्णाच्या अत्यंत जवळचा व्यक्ती असतो, त्यामुळे नर्सिंग क्षेत्राचे खूप जबाबदारीचे काम आहे. सध्या जगभरात प्रत्येक रुग्णालयात नर्सिंग स्टाफचा तुटवडा भासत आहे यासाठी मविप्र समाज संचलित नर्सिंग महाविद्यालयांमधून घडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देशात व परदेशात भासत असलेल्या नर्सेसच्या तुटवड्यावर परिणामकारक ठरतील व नुसते संस्थेचे, नाशिकचे किंवा राज्याचे नव्हे तर संपूर्ण भारताचे नाव जगभरात उज्वलित करतील असे प्रतिपादन डॉ.राजेंद्र बंगाल कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी याप्रसंगी केले.
नर्सिंग हे सेवाभावी क्षेत्र आहे व सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात नर्सिंग क्षेत्रात उत्तम संधी निर्माण होणार आहेत. नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संवेदनशील, दक्ष ,शिस्तप्रिय व समाजसेवा जोपासणे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे यांनी केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर दीपप्रज्वलन व शपथग्रहण सोहळ्याचा बहुमान परिचर्या व्यवसायाच्या आद्य प्रवर्तक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्याकडे जातो,त्यांनी केलेल्या जखमी सैनिकांच्या सुश्रुशेमुळे परिचारिका व्यवसायाला जगभर प्रतिष्ठा लाभली. मविप्र समाज संचलित नर्सिंग महाविद्यालयात नव्याने प्रवेशित परिचारिका विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा हा खरंतर विद्यार्थ्यांमध्ये सुश्रुषा व मानवतेचे भाव रुजवणारा सोहळा. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा नाईक यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना परिचर्या व्यवसायाची शपथ दिली. या शपथग्रहण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की रुग्णसेवा हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी ते जबाबदारीने संपूर्ण ज्ञान आणि कौशल्य वापरत रुग्णसेवा करतील व एक जबाबदार नागरिक म्हणून समाजाचे उत्तरदायित्व पार पाडतील.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॉलेज मॅगझिन “अनुभूती ” च्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या अभ्यासेतर उपक्रम आणि महाविद्यालयाचा भविष्यातील दृष्टीकोन योजना याबद्दल प्राचार्या डॉ.पौर्णिमा नाईक यांनी अहवाल सादर केला. महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी परिचारिका पारितोषिक कु.अनघा थॉमस,कु.अनुजा पावले, कु.नम्रता ठाकूर या विद्यार्थीनिंना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक सारा टॉमी, भूषण ठोंबरे ,वनीता गायकवाड, हेमंत डांगे, विनायक गुंजाळ, नयना शिंदे, पूनम मते, सुजाता कवडे ,सुवर्णा कदम,अभिजीत महाले यांनी विशेष मेहनत घेतली. सहाय्यक प्राध्यापक श्री.भूषण ठोंबरे व करिष्मा ठोके यांनी संपूर्ण सोहळ्याचे व प्राध्यापिका श्रीमती.सारा टॉमी यांनी पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन केले. सौ.पूनम मते यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.