अमरावती, दि. 28 : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी मतदानावर बोलू काही या फेसबुक लाईव्ह शो चे आयोजन केले असून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
सोशल मीडिया हे युवकांमध्ये आवडीचे माध्यम असून आबालवृद्ध सोशल मीडियावर सक्रिय आहे. या माध्यमाचा उपयोग करून घेतल्यास मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निश्चितच फायदा होईल, ही बाब लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकापर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी “मतदानावर बोलू काही……” या लाईव्ह फेसबुक शो चे आयोजन हेमंतकुमार यावले यांच्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात येत आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, तज्ज्ञ मार्गदर्शक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यांना निमंत्रित करून त्यांच्या सोबत संवाद साधण्यात येत आहे.
मतदानावर बोलू काही या फेसबुक लाईव्ह शो ला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असून युवकांमधून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करणे, मतदारांना त्यांच्या मतांचे मूल्य समजावून सांगणे, त्यांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणे, लोकसभेचा उत्सव जागोजागी मोठ्या प्रमाणात आयोजित करणे, मतदारांमध्ये मतदानाबाबतचे नैराश्य कमी करणे, त्याचबरोबर एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
मतदानावर बोलू काही हा एक अतिशय उत्तम, दर्जेदार, मनोरंजनात्मक आणि मतदारांना आवडेल, रुचेल असा डॉ.कैलास घोडके यांचा फेसबुक लाईव्ह शो असून जास्तीत-जास्त मतदारांनी हेमंतकुमार यावले यांच्या फेसबुकला भेट देऊन या शोमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.