नांदेड, दि. २८ : निवडणूक काळात आपल्या ‘व्हाट्सअप’, ग्रुप वरून प्रचार करणे एका कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले आहे. पंचायत समिती नायगाव येथील यु. एस. धोटे या वरिष्ठ सहाय्यकाला निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज जारी केले आहे.
‘व्हाट्सअप ‘द्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ मधील कलम ३व ४ कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात निलंबनाची ही पहिली कारवाई ठरली असून आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.