सांगली, दि. १३ : मिरज ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 19 कोटी 50 लाख रूपये इतका निधी देण्यात आला आहे. यामधून सुसज्ज, देखणे व मिरज शहराच्या वैभवात भर पडेल असे सर्व सोयी सुविधायुक्त मिरज ग्रामीण बसस्थानक तयार होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या मिरज (ग्रामीण) बसस्थानक बांधकामाचे भुमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, माजी महापौर संगीता खोत, परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, विभागीय अभियंता सुशांत पाटील, मिरज आगार व्यवस्थापक श्रीमती किरगत, धनंजय कुलकर्णी, विठ्ठल खोत, उमेश हारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज ग्रामीण बसस्थानकाची 1983 साली स्थापना झाली होती. यामध्ये 15 फलाट व इतर सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. परंतु ग्रामीण भागातून पूरक रेल्वे सेवा मिरज शहरामध्ये जोडली गेली असल्याने तसेच मिरज शहर हे वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच कर्नाटकमधूनही प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सद्याचे मिरज ग्रामीण बसस्थानक अपुरे पडत आहे. कर्मचारी, प्रवाशी यांनाही अडचण होत आहे. त्यासाठी या बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक होते. मिरज शहर व ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे 37 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये मिरज ग्रामीण बसस्थानकासाठी 19 कोटी 50 लाख रूपये इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आली असून त्याच्या कामाची सुरवात करण्यात येत आहे. मिरज येथील शहरी बस स्थानकही लवकरच सुसज्ज करण्यात येईल.
बसस्थानकाचे तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी संबधितांना दिले. तसेचन काम सुरू असताना प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देवून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मिरज ग्रामीण नव्याने बांधण्यात येणाऱ्या मिरज ग्रामीण बसस्थानकामध्ये तळमजला व पहिला मजला असे एकूण 1 हजार 965 चौ.मी. चे बांधीव क्षेत्रफळ आहे. यामध्ये तळमजल्यात 18 फलाट, सुलभ शौचालय, प्रतिक्षालय, वाहतूक निरीक्षक, पार्सल ऑफीस, जेनेरिक मेडिकल, आरक्षण, हिरकणी कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, महिला विश्रांतीगृह, उपहारगृह, दुकान गाळे इत्यादीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पहिल्या मजल्यामध्ये चालक-वाहक विश्रांतीगृह, लेखा शाखा, तिकीट व रोकड शाखा, प्रसाधनगृह तसेच पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटींग, ट्रीमिक्स पेव्हमेंट, पेव्हर ब्लॉक पार्किंगकरिता, आर.सी.सी. स्ट्रॉम वॉटर ड्रेन, संरक्षक भिंत, लँडस्केप, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामाची अंदाजित रक्कम 13 कोटी 96 लाख 95 हजार 797 रूपये इतकी असल्याचे यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात परिवहन महामंडळाचे विभागीय अभियंता सुशांत पाटील यांनी बसस्थानकाबाबतची सविस्तर माहिती दिली. प्रतिदिन प्रवासी संख्या सुमारे 25 हजार इतकी आहे. त्यामुळे सध्याच्या सोयी सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे आधुनिकीकरण गरजेचे होते. त्यासाठी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या पाठपुरावा व विशेष प्रयत्नांमुळे सर्व सोयी सुविधायुक्त मिरज ग्रामीण बसस्थानकाचे नव्याने बांधकाम होत असल्याचे ते म्हणाले. आभार विभाग नियंत्रक सुनिल भोकरे यांनी मानले. कार्यक्रमास परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालयांचे भूमिपूजन
जिल्हा रूग्णालय व माता बाल संगोपन रूग्णालयांमुळे गोरगरीब जनतेला आधार मिळेल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
जिल्हा रूग्णालय व माता बाल संगोपन या सांगली येथे नविन बांधण्यात येणाऱ्या रूग्णालयांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होतील. आरोग्य पंढरीला साजेशा अशा सोयी सुविधा या रूग्णालयांच्या माध्यमातून मिळतील. गोरगरीब जनता शासकीय हॉस्पीटलमध्ये येते. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून या रूग्णालयांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन नुतन रूग्णालयांचे भुमीपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, निता केळकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सारंगकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे बांधण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या जिल्हा रूग्णालयासाठी 46 कोटी रूपये व माता बाल संगोपन रूग्णालयासाठी 36 कोटी रूपये अशा एकूण 82 कोटी रूपयांचया रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मिरज येथेही नर्सिंग कॉलेज व 100 बेडचे माता बाल संगोपन रूग्णालय होत आहे. मिरज येथे मल्टीपर्पज हॉस्पीटल सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्था, ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासकीय रूग्णालयातून गोरगरीब जनतेला सर्व औषधे मिळावीत यासाठी डीपीडीसीमधून निधी देवू, असे ते यावेळी म्हणाले.
खासदार संजय पाटील म्हणाले, मिरज व सांगली ही वैद्यकीय नगरी म्हणून प्रसिध्द आहे. सांगली येथे होणाऱ्या 100 बेडच्या नविन दोन रूग्णालयांचा गोरगरीब जनतेला लाभ होईल. या रूग्णालयांच्या माध्यमातून रूग्णांची सेवा व्हावी, त्यांना दिलासा मिळावा. या रूग्णालयांचे काम लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन रूग्णालय सांगली येथे होण्यासाठी 2017 पासून पाठपुरावा व प्रयत्न सुरू केले होते. या रूग्णालयांमुळे एक चांगली सुविधा निर्माण होईल. काहीवेळा रूग्णांना बाहेरून औषधे आणावी लागतात, हा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते यावेळी म्हणाले.
प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन नुतन रूग्णालयांमुळे अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होतील. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्व सोयीयुक्त हॉस्पीटल सुरू झाल्यामुळे एक सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण होईल व गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न करू, असे ते यावेळी म्हणाले.
आभार डॉ. प्रमोद चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरज येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन
मिरज येथे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक संदीप आवटी, शिवाजी दुर्वे यांच्यासह अन्य मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
मिरज येथील वॉर्ड क्र. 3(ब) मधील मिरज पंढरपूर रोड येथील स्मशानभूमी विकसित करणे, इस्त्राईलनगर अंतर्गत रस्ते हॉटमिक्स करणे, ईदगाहनगर ते पंढरपूर रोड रस्ता हॉटमिक्स करणे या कामांचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मिरज पंढरपूर रोड येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून 9 लाख 99 हजाार 649 रूपये, नगरविकास विशेष अनुदान योजनेतून इस्त्राईलनगर अंतर्गत रस्ते हॉटमिक्स करण्यासाठी 36 लाख 18 रूपये व नगरविकास विशेष अनुदान योजनेतून ईदगाहनगर ते पंढरपूर रोड रस्ता हॉटमिक्स करण्यासाठी 32 लाख रूपये अशी या कामांची अंदाजपत्रीय रक्कम आहे.