मुंबई : विधान सभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला आहे, अशा शब्दात चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विवेकानंद हिंदू ज्ञानपीठ या संस्थेच्या माध्यमातून शाळांचे जाळे उभे करून शिक्षण प्रसारास मोठा हातभार लावला. त्यांची राजकारणात प्रामाणिक राजकारणी म्हणून ख्याती होती. वरोरा भद्रावती मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात त्यांनी एकेकाळी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. नंतरच्या काळात त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला होता आणि पाँडेचेरीच्या योगी अरविंद आश्रमाचे ते अनुयायी बनले होते. त्यांच्या रूपाने भारतीय संस्कृतीकडे कल असलेला एक सरळ प्रामाणिक राजकारणी आपण गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.