
भारताची शान, भारत मातेचा माथा मानलं जाणाऱ्या काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या (Yasin Malik) पापाचा घडा अखेर भरला आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने (NIA Special Court) यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली (Yasin Malik sentenced to life imprisonment) आहे. कोर्टाने याआधीच यासिनला दोषी ठरवलेलं होतं. त्याने केलेल्या दुष्कृत्यांवर कोर्टात गेल्या आठवड्यात गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा त्याने आपला सर्व गुन्हा कबूल केला होता. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर पटियाला कोर्टाकडून आज यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोर्टाच्या निकालाआधीच श्रीनगरमध्ये दगडफेक
एकीकडे कोर्टाकडून यासिन मलिकला आज शिक्षा सुनावण्यात येत होती. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये यासिनच्या समर्थकांनी अराजकता माजवायला सुरुवात केली. श्रीनगरमध्ये यासिनच्या काही समर्थकांनी दगडफेक केली. यासिनच्या घराबाहेर त्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. सध्याच्या घडामोडी पाहता जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्यदल, सीआयएसएफचे जवान श्रीनगरच्या प्रत्येक गल्लोगल्लीत लक्ष ठेवून आहेत. काही अविघटीत घटना घडू नये यासाठी ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने फुटीरतावादी यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवलं आहे. याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एनआयएला यासीन मलिकची आर्थिक स्थिती जाणून घेण्यास सांगितले होते. एवढेच नाही तर न्यायालयाने यासीन मलिकला त्याच्या मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले होते. याच महिन्यात यासीन मलिकने दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याची कबुली दिली होती. यासिन मलिकने न्यायालयाला सांगितले की तो कलम 16 (दहशतवादी क्रियाकलाप), 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य असणे) साठी दोषी आहे. UAPA आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120-B (गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) अंतर्गत त्याच्यावरील आरोपांना आव्हान देऊ इच्छित नाही.2017 मध्ये यासीन मलिकवर UAPA कायद्यांतर्गत दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग, दहशतीसाठी पैसे गोळा करणे, दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे असे गंभीर आरोप होते, ज्याला त्याने आव्हान देऊ नये असे सांगितले आणि हे आरोप स्वीकारले. हे प्रकरण काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाशी संबंधित आहे. 2017 मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे. खोऱ्यातील वातावरण बिघडवण्यासाठी सातत्याने दहशतवादी कारस्थान रचले जात होते आणि घटना घडत होत्या. नेमके, याच प्रकरणात दिल्लीच्या विशेष न्यायालयात फुटीरतावादी नेत्याविरुद्ध सुनावणी झाली, ज्यामध्ये यासीनने आपला गुन्हा कबूल केला.या प्रकरणी न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ बिट्टाकराटे, शबीर शाह, मसरत आलम यांच्यासह 15 आरोपींवर यापूर्वीच आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणात लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल प्रमुख सय्यद सलाहुद्दीन हेही आरोपी असून त्यांना न्यायालयाने फरार घोषित केलं आहे.