मुंबई : मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येईल, असे आज मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मंत्रालयात तारापोरवाला मत्स्यालयासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भातील निर्देश विभागाला दिले.
हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हे मत्स्यालय जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक गणले जावे, याचे नियोजन करावे, असेही निर्देश मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.
मुंबईची ओळख असलेले तारापोरवाला मत्स्यालय गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत जवळपास 75 वर्षे जुनी आहे. तर बाजूची इमारतही 50 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. मत्स्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला असून त्या धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे या इमारती लवकरात लवकर निर्लेखित करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले. सध्या तारापोरवाला मत्स्यालयात 16 सागरी पाण्याच्या टाक्यांमध्ये 31 प्रकारचे मासे आहेत. तर गोड्या पाण्यातील आणि 32 ट्रॉपिकल टाक्यांमध्ये 54 प्रकारचे मासे आहेत.
तारापोरवाला मत्स्यालयाबाबतच्या या आढावा बैठकीस मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव पराग जैन नानोटिया, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.