
देशात सध्या महागाईनं उच्चांक (Inflation Rise) गाठला आहे. जीवनावश्यक गोष्टीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. भाज्या, फळं, धान्यं हे सगळं महिन्याच्या बजेटमध्ये बसवताना सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. महागाईच्या दरानं गेल्या 8 वर्षांतला उच्चांक गाठला आहे. एप्रिलमध्ये महागाईचा किरकोळ दर 7.79% होता. यापूर्वी 2014 मध्ये महागाईचा दर 8 टक्क्यांपेक्षा वर गेला होता.
‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे. महागाई हा माणसाचा आनंद, सुख हिरावून घेणारा एक राक्षस आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही. भारतासारख्या देशात तर महागाईचा दर वाढणं हा एक आणखीनच चिंतेचा विषय आहे. कारण आपल्या देशात आजही 80 कोटींपेक्षा जास्त जनता गरीब आहे. आपल्या देशात सर्वसामान्य माणसाचं महिन्याचं उत्पन्न सरासरी साडेबारा हजार आहे. सध्याच्या महागाईच्या काळात या 80 कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी सरकारतर्फे मोफत धान्य दिलं जातं.
सरकारच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर (Consumer Price Index- CPI) आधारित किरकोळ महागाई दर 7.79 % इतका होता. गेल्या 8 वर्षांमधील हा सर्वांत उच्चांकी दर आहे. यापूर्वी 2014 च्या मे महिन्यात महागाईचा दर 8.33% होता.
कोरोनामुळे आधीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात आता महागाईनं पार कंबरडं मोडलं आहे. महागाईचा दर वाढणं याचाच अर्थ कोणत्याही वस्तू किंवा सेवेची किंमत काळानुसार वाढणं. याला कोणत्याही महिना किंवा वर्षाच्या हिशेबानुसार मोजलं जातं. उदाहरणार्थ वर्षभरापूर्वी जर एखादी वस्तू 100 रुपयांना मिळत असेल आणि आता तिची किंमत 105 रुपये झाली असेल तर याचा अर्थ त्याचा वार्षिक महागाई दर 5 टक्के आहे. म्हणजेच आज आपल्याकडे असलेल्या 105 रुपयांची किंमत ही एक वर्षभरापूर्वी 100 रुपयांच्या बरोबरीची आहे.
– सध्या महागाईचा दर 2012 च्या बेस प्राईसवर मोजला जातो. म्हणजेच 2012 मध्ये 100 रुपयांत जी गोष्ट आपण खरेदी करू शकत होतो तिच्यासाठी आता किती किंमत मोजावी लागते यावरून त्याचा अंदाज बांधला जातो.