
महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) आगामी काळात कोणत्या दिशेला जाईल याचा आताच अंदाज बांधता येणार नाही. कारण राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी त्याच्याच प्रत्यय देत आहेत. राज्यातील सध्याचं महाविकास आघाडीचं सरकार (MahaVikasAghadi Government) हे त्याचचं एक उत्तम उदाहरण आहे. शिवसेना (Shiv Sena) भाजपसोबत (BJP) असलेली पारंपरिक युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) जावून सरकार स्थापन करेल, असं तीन वर्षांपूर्वी कुणालाही वाटलं नव्हतं. पण तेच प्रत्यक्षात घडलं. या राजकीय घडामोडींची आज आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (RamdasAthawale) यांनी केलेलं विधान. रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षासोबत एकत्र यावं, असं खुलं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. त्यामुळे आगामी काळात एक वेगळं राजकीय समीकरण उभं राहण्याची शक्यता आहे. पण प्रकाश आंबेडकर यांच्या अनुमतीशिवाय ते समीकरणं उभं राहणं अशक्यच आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त देवळाली कॅम्प शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना आपल्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आपण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.