मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायींना यंदाही सोयी-सुविधा देताना सर्व यंत्रणांनी कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची खबरदारी घ्यावी. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे. यासाठी सामाजिक न्याय विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी मैदान येथे शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव गृह (विशेष) संजय सक्सेना, प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन नानोटिया, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) संजय कुमार, मुंबई शहरचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मध्य रेल्वेचे अपर प्रबंधक अमरेन्द्र सिंह, अपर मंडल रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे शीत मरू, मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त अमरेश कुमार, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे मार्गदर्शक भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी, रवि गरूड,महेंद्र साळवे, मयुर कांबळे, रमेश जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, चैत्यभूमीवर कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात अनुयायी येतील. त्यामुळे वाढणारी संख्या लक्षात घेवून मुंबई महापालिकेने चांगले नियोजन केले आहे. यापूर्वी या विषयाच्या अनुषंगाने नियोजनाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कामामध्ये त्रुटी राहू नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे ही चांगली गोष्ट आहे. मुंबई महापालिका, गृह, एसटी, सामाजिक न्याय विभाग या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने स्वच्छता करावी. त्याचबरोबर या परिसरात कायदा सुव्यवस्था सुरळीत राखावी. ज्या ठिकाणाहून एसटीने अनुयायी चैत्यभूमीकडे येणार आहेत अशा एसटीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिवादनपर फलक लावावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाजवी दरात उपलब्ध होण्यासाठी स्टॉल लावण्यात यावा जेणेकरून एक विचारांचा शिधा आपल्याला या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवता येईल.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यावर्षी प्रमुख पाहुण्यांसाठी चैत्यभूमी येथे दर्शनासाठी एक ठराविक वेळ ठेवण्यात यावा जेणेकरून अनुयायांना चैत्यभूमी येथे दर्शन घेताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अनुयांयासाठी वॉटरप्रूफ मंडप, रांगेतील अनुयायांना बिस्कीटे आणि पाणी वाटपाचा निर्णय देखील चांगला आहे. अनुयायांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी रेल्वे, मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी पूर्वतयारी चांगल्या प्रकारे करावी. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करावे, सामाजिक न्याय विभाग व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी सर्व मान्यता लवकरात लवकर घ्याव्यात. पुढच्या वर्षी याच दिवशी इंदू मिल सर्वांसाठी खुली करण्यात येवू शकेल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, चैत्यभूमी व्यवस्थापक नियोजन समितीचे रमेश जाधव यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाने करावयाच्या कामाबाबत विविध सूचना बैठकीत केल्या.