मुंबई : शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने बनावट देयक देणाऱ्या करदात्या विरोधातील विशेष मोहिमेंतर्गत ७.०८ कोटी रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी जगदीश जगन्नाथ पाटील, (वय ४८) या व्यापाऱ्यास अटक केली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर आयुक्त प्रकाश शेळके यांनी दिली.
मे. अर्णव क्रिएशन या व्यापाऱ्याचे दोन मोठे पुरवठादार मे. हेना इंटरप्रायझेस व मे. एक्सकर्सी ओव्हरसिज हे करदाते अस्तित्वात नसून बोगस आहेत व त्यांनी बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी केली आहे. या करदात्यांकडून व्यापाऱ्याने रु.७.०८ कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, असे अन्वेषण भेटीदरम्यान आढळून आले.
या प्रकरणी महानगर दंडाधिकारी न्यायालय, मुंबई यांनी जगदीश जगन्नाथ पाटील यांस दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात सहायक राज्यकर आयुक्त अर्जुन प्रकाश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात, सहायक राज्यकर आयुक्त, रमेश अवघडे, राज्यकर निरिक्षक व कर सहायक प्रज्ञा ब्रम्हांडे यांनी ही कारवाई केली.
राज्यकर सह-आयुक्त अनिल भंडारी व राज्यकर उपायुक्त मोहन बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली.
सन २०२२-२३ मध्ये खोटी देयके देऊन तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करुन करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी या मोहिमेअंतर्गत आतापर्यंतची ही ४९ वी अटक आहे, असे राज्यकर आयुक्त प्रकाश शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे कळविले आहे.