मुंबई – संतांचे जीवन सदैव समाज कल्याण आणि मानवसेवेसाठी समर्पित असते. संतांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक संस्थांनीसुद्धा मानवसेवेसाठी समर्पित होऊन समाज हितासाठी योगदान द्यावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी नि:स्वार्थपणे कार्य करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राष्ट्र उभारणीत संत आणि सामाजिक संस्थांचे योगदान’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, पूज्य आचार्य डॉ. लोकेश, गुरुदेव राकेश भाई राजचंद्र मिशन धरमपुर, पृथ्वीराज कोठारी , संजय घोडावत,जयंत जैन संबंधित मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, राष्ट्र उभारणीत संतांचा मोठा वाटा आहे. राष्ट्राची उभारणी केवळ भौतिक सुविधांनी होत नाही तर त्यासोबत संस्कार, विचार आणि अध्यात्मिक विकास महत्वाचा असतो. संत, महापुरुषांनी आणि सामाजिक संस्थांनी नेहमीच राष्ट्राला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्याचा प्रयत्न केला आहे आणि समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे.संताची शिकवण सदैव प्रेरणादायी असते.
राष्ट्रीय एकता आणि अखंडता राखण्यासाठी सर्व घटकांनी कार्य करावे – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
आत्मनिर्भर भारत म्हणून जागतिक पातळीवर भारताची वेगळी ओळख निर्माण होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे. सर्वांनी देशहितासाठी निष्ठेने सामाजिक कार्य करावे. अहिंसा विश्वभारती संस्थेने समाज राष्ट्र आणि संपूर्ण जगात शांतता आणि सद्भावना प्रस्थापित करून धर्माला समाजसेवेची आणि अध्यात्मतेची जोड देऊन सामाजिक दृष्कृत्यांचे निर्मूलन करण्याचे माध्यम बनवले. अहिंसा विश्व भारती आणि विश्वशांती केंद्र ही संस्था राष्ट्रीय चारित्र्य निर्माण, मानवी मूल्यांच्या उन्नतीसाठी आणि अहिंसेच्या प्रचारासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. देशाच्या विकासासाठी सामाजिक एकता, अखंडता महत्वाची आहे. असेही श्री गोयल यांनी सांगितले
अहिंसा विश्व भारती तसेच विश्व शांति केंद्राच्या स्थापना दिवस निमित्त राज्यपाल श्री. भागतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक गुरुदेव राकेश भाई राजचंद्र मिशन धरमपुर,जिओ अपेक्सचे पृथ्वीराज कोठारी ,संजय फाऊंडेशनचे संजय घोडावत यांना अहिंसा आतंरराष्ट्रीय अवार्ड २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान ‘एम्बेसडर ऑफ पीस’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहिंसा विश्वभारती-विश्वशांती केंद्र परिचय चित्रफीत दाखविण्यात आली.