मुंबई : स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड- 1 ते 13 या मोबाईल ॲपचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे येत्या सोमवार, दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी लोकार्पण होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ जसे असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या 13 खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.
लोकार्पण सोहळयादरम्यान स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या ‘अज्ञात पैलू’ तसेच मराठी, हिंदी, उर्दु भाषेतील निवडक रचनांवर आधारित ‘यशोयुताम् वंदे’ हा कार्यक्रम होणार असून पुणे येथील कलासक्त संस्थेच्या 25 नृत्यांगना त्यावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाद्वारे पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीद्वारे प्रायोगिक नाट्यगृहाचे उट्घाटन होणार आहे.