मुंबई : राज्यात 17 वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-2022 चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असून ही स्पर्धा भारतीय मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-2022 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मंत्री श्री.महाजन बोलत होते.
मंत्री श्री.महाजन म्हणाले, 17 वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक 2022 या स्पर्धेत भारत, चीन, जपान, मोरोक्को, नायजेरिया, टांझानिया, कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, ब्राझील, चिली, कोलंबिया, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन हे 16 देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील एकूण पाच सामने राज्यात होणार आहेत. नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियम आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या मैदानावर हे सामने होणार आहेत.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांशी संबंधित अधिकारी यांना मंत्री श्री.महाजन यांनी प्रत्येक विभागाच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असल्याने देशातील अतिमहत्त्वाचे लोक हे सामने पाहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्टेडियम, वाहतूक, निवास, सुशोभीकरण, अग्निशमन व्यवस्था व रस्त्याची दुरुस्ती, वैद्यकीय व्यवस्था, स्पर्धा प्रसिद्धी, विविध समित्यांचे गठन आदी विषयांचा आढावा मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी घेतला.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, स्पर्धा केवळ सहभागी खेळाडूंनाच फायद्याची नाही तर संबंधित यजमान राष्ट्रांसाठीही खूप मोलाची ठरणार आहे. या महिला विश्वचषकाने तळागाळातील अधिक तरुण मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहित करून लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याबरोबरच महिला फुटबॉलचे व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकेतील ठाणे व रायगड जिल्ह्यातील, शालेय विद्यार्थ्यांना हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहता येईल, असे नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी आयोजन समितीला दिल्या.
भारत 2022 च्या स्थानिक आयोजन समितीने (LOC) अशा प्रकारे आगामी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन घेतला आहे, जेणेकरून देशाला अभिमान आणि गौरव मिळेल. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हा विकासाचा एक केंद्रबिंदू असताना, देशातील महिला फुटबॉलचा लँडस्केप बदलण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
अशा प्रकारे सकारात्मक वारसा मागे ठेवण्यासाठी विविध उद्दिष्टे ठेवली गेली आहेत. फुटबॉल नेतृत्व आणि निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, अधिक मुलींना भारतात फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित करणे, लहानपणापासून समान खेळाची संकल्पना सामान्य करून सर्वसमावेशक सहभागासाठी प्रयत्न करणे, भारतातील महिलांसाठी फुटबॉलचा दर्जा सुधारण्याची संधी निर्माण करणे, महिलांच्या खेळाचे व्यावसायिक मूल्य सुधारणे, प्रत्येक उद्दिष्टाची काळजी घेऊन स्थानिक आयोजन समितीने सर्व आघाड्यांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.
या आढावा बैठकीस क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नवीन येणारे आयुक्त सुहास दिवसे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, फिफाचे प्रतिनिधी रोमा खान, क्रीडा विभाग, नवी मुंबई पोलीस, महानगरपालिकेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.