नागपूर : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. त्या भागाचा सर्वे करा. पंचनामे करा, त्यांच्या भावना समजावून घेवून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
नागपूर ग्रामीण मधील मौजा पांझरीलोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, नायब तलसीलदार सचिन शिंदे, नियोजन मंडळाचे सदस्य, पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी पांझरीलोधी येथील शेतकरी प्रशांत मारोती ठाकूर यांच्या कापूस शेतीची पाहणी केली. शेतात आठ ते दहा दिवस पाणी साठल्याने तेथील पीक पुर्णत: करपून गेले आहे. तेथे पुर्नशेतीच करावी लागणार आहे. त्यासोबत वारंगाचे सरपंच राजेश भोयर यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचेही पीक नष्ट झाले आहे. तलाठी, कृषी सहायकांनी योग्य सर्व्हे व पंचनामे करावेत. प्रत्यक्ष तपासणी सोबतच त्या भागाची व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीसह योथोचित प्रस्ताव सादर करावेत. जेणे करुन अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, या कामात कुठलीही हयगय होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली.
यावेळी गावातील शेतकरी, नागरिक, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक उपस्थित होते.