मुंबई :- दहीकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव म्हणजे मराठी मनामनांत उधाणलेला उत्साह. या उत्सव, उत्साहातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करूया, त्यातून येणारी समृद्धी, आनंद, समाधानाची लयलूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गोविंदा पथकांनी या उत्सवात सहभागी होताना पुरेशी काळजी घ्यावी, आयोजकांनीही सतर्कता बाळगून उत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, गेली दोन वर्षे निर्बंधांमुळे या उत्सवाच्या उत्साह, जल्लोष आणि आनंदाला मुकलो होतो. पण यंदा मात्र सुदैवाने संधी मिळाली आहे,तर खबरदारी घेऊन या उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटूया. भगवान श्रीकृष्ण यांनी दाखवलेल्या आव्हानांवर मात करण्याच्या मार्गावर चालताना, या उत्सवाकडून प्रेरणा घेऊन विकासाला गवसणी घालण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया. त्यासाठी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीकाला उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा.