मुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सद्भावना दिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
जात – वंश – धर्म – भाषाविषयक भेदभाव न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करणे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील प्रतिज्ञा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली.
यावेळी लोकप्रतिनिधी यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सामूहिक प्रतिज्ञा घेतली.