मुंबई : नागपूर विभागामध्ये गेल्या २४ तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्त भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरु आहे. १५३१ नागरिकांना गेल्या २४ तासात सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्यात इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.
राज्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असून कुठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.
नागपूर विभागामध्ये गेल्या २४ तासात सरासरी २१.५५ मिमी एवढा पाऊस झाला असून भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिनांक १४ ते १५ ऑगस्ट २०२२ या २४ तासाच्या कालावधी मध्ये गोंदिया जिल्हा तसेच मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात सरासरी १७३.५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तसेच वैनगंगा नदीची उपनदी असलेल्या बाघ नदीवरील शिरपूर व पुजारीटोला या धरणातून चालू असणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात २६.२ मिमी एवढा पाऊस झाला असून बाघ व बावनथडी या नद्या धोका पातळीच्या वर वाहत असून पूरग्रस्त भागातील २०० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.
गोंदिया जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती व वैनगंगा नदी पातळीत झालेली वाढ याचा परिणाम भंडारा जिल्ह्यावर झाल्याने भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात भंडारा जिल्ह्यात २५ मिमी एवढा पाऊस झाला असून वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. पूरग्रस्त भागातील ९०० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात SDRF चे एक पथक व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.
दिनांक १४ ते १५ ऑगस्ट २०२२ या २४ तासाच्या कालावधी ७७.६ मिमी एवढा पाऊस झाला होता. तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचा विसर्ग व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रवती नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ याचा एकत्रित परिणामामुळे गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३५.१ मिमी पाऊस झाला असून प्राणहिता नदी धोका पातळीच्या वर वाहत असून पूरग्रस्त भागातील ४३१ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात SDRF चे ०२ पथक व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.
राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात
राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-१, कोल्हापूर-२, सातारा-१, सांगली- २ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १३ पथके तैनात आहेत.
नांदेड- १, गडचिरोली- २,भंडारा-१, अशी एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे व ३२५ गावे प्रभावित झाली आहेत. ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे १२० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २४३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५३४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.