मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबंधी माहिती द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी मंत्रालयात आज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी चांगल्या वानांची बियाणे, पीक विमा, किटक नाशके, खते, शासनाच्या कृषी योजना, नवनवीन कृषी संशोधन यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना गावागावात जाऊन द्यावी म्हणजे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले.
शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या वानाची माहिती, खत कोणते वापरावे, कृषी संबंधी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल यासंबंधीची माहिती द्यावी. ग्रामसभा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी कृषीसहायकांना आराखडा आखून देण्यात यावा, अशा सूचनाही कृषी मंत्र्यांनी केल्या. अतिवृष्टी आणि किड प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी त्वरीत पंचनामे करुन त्यासंबंधीचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कृषी विद्यापिठाने नवनवीन संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, विविध बियाणे कंपन्यांची तुलना करुन जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. इस्त्रायल सारख्या देशाच्या शेतीचा अभ्यास करुन त्या धर्तीवर येथील शेतीमध्ये बदल घडवावा, अशा सूचनाही श्री. सत्तार यांनी यावेळी केल्या. राज्याच्या काही भागात पिकांवर गोगलगाईसारख्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याबाबत मी स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अधिकाऱ्यांनी विभागवार सादरीकरण करुन राज्यातील कृषी क्षेत्राची माहिती दिली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त, पुणे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण),पुणे, कृषी संचालक (मृदसंधारण), पुणे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), पुणे, कृषी संचालक (कृषी प्रक्रिया/नियोजन), पुणे, कृषी संचालक(फलोत्पादन), पुणे, कृषी संचालक (आत्मा), पुणे आदी उपस्थित होते.