मुंबई: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व) येथे झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास आमदार झीशान सिद्दिकी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त डी.एस.स्वामी, पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2019-20 मध्ये उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात रेयान इंटरनॅशनल स्कूलची खुशी रविंद्र वांडीले, ॲटोमिक एनर्जी स्कूलची श्रीष्टी रजीतराम यादव, विद्याभवन हायस्कूलचा जय गंगाधर गायकवाड, रेयान इंटरनॅशलन स्कूलचा केशव कमलेश माहेश्वरी, रेयान इंटरनॅशनल स्कूलचा रिषभ रामचंद्र गुप्ता, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा आर्य विनय साहनी, डॉन बास्को हायस्कूलचा अरिन प्रशान वेलींग, डॉन बॉस्को हायस्कूलचा सोहम समीर पालकर आणि ए.पी.संघ सुविद्यालयाचा तेजस जगदिश लांडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ७५ फूट राष्ट्रध्वजाचे अनावरण मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते इलेक्ट्रिक कळ दाबून स्वयंचलित पद्धतीने करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव शिल्पाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्याचे आले. त्यानंतर मंत्री श्री.लोढा यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महात्मा गांधी विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका दिपिका गावडे यांनी केले.