नागपूर : आपला इतिहास विसरणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल कळत नाही. त्यामुळे देशाप्रति संवेदनशील असणारी, आत्मभान असणारी नवी पिढी निर्माण करण्यासाठी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळला जात असल्याचे प्रतिपादन, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस केंद्र व राज्य शासनाने जाहीर केला आहे. यानिमित्त आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फाळणी वेदना दिवस पाळला जात आहे. यानिमित्ताने फाळणी आणि वेदना या विषयावर नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये फाळणीची वस्तुस्थिती मांडली असून हे प्रदर्शन 13 ते 17 ऑगस्ट या काळामध्ये सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात खुले ठेवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते आज झाले. यावेळी फाळणीमध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबांचा सन्मान व नागरिकत्व दाखले वितरण करण्यात आले तर स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मानही करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष जायस्वाल, माजी खासदार डॉ.विकास महात्मे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, मनरेगा आयुक्त शर्तनू गोयल, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसा साजरा करावा याबद्दलचे नियोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आजादी का अमृत महोत्सव हा सरकारी नव्हे, सामाजिक उपक्रम झाला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक समाज घटक यामध्ये सहभागी झाले पाहिजे. आज आम्ही जो दिवस पाळत आहो, हा अतिशय दुःखाचा आहे. त्यामुळे आजचा दिवस साजरा नव्हे तर पाळत आहोत, असे आपण म्हटले पाहिजे.
खरे म्हणजे आज आपण विभीषिका यासाठी पाळायला हवी कारण, जो समाज इतिहास विसरतो त्याला वर्तमानही असत नाही आणि भविष्यही असत नाही. चांगल्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. पण जे वाईट झाले ते पुन्हा होऊ नये यासाठी आजचा दिवस आहे. विभाजनाच्या बिजापोटी राष्ट्राचे तुकडे झाले. एक अखंड देश विभागल्या गेला. देश विभागला जाणे ही असह्य वेदना असते. फाळणी ही अशीच एक असह्य वेदना आहे. फाळणीने अखंड भारत तोडला आहे. त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये भेदभाव दूर करून संघटित भारत उभारण्यासाठी आजची विभीषिका आपण पाळत असल्याचे सांगितले.
आजच्या कार्यक्रमात काही नागरिकांना नागरिकत्व दाखले द्यावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पाकिस्तान मधून अनेक विस्थापित कुटुंब भारतात येत असून त्यांना भारताचे नागरिकत्व हवे आहे. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केली की, जिल्ह्यामधील अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात असून एक विशेष कॅम्प घेऊन नागरिकत्व बहाल करण्यात यावे. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसंदर्भातील ज्या अनामवीरांची कुठेच नोंद झाली नाही. त्याची नोंद झाली पाहिजे त्याचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे. नव्या पिढीला हे माहीत पडले पाहिजे, यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना देखील केल्या. स्वातंत्र्याचे मोल जाणणारी एक नवी पिढी आपल्याला निर्माण करायची आहे. आत्मभान असणारी पिढी निर्माण करायची असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना तरुण भारतचे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव यांनी धार्मिक विद्वेष हेच फाळणीचे मुख्य कारण होते, असे स्पष्ट केले. विभाजनाच्या वेदना असह्य आहेत. विभाजनात केवळ भूखंड वाटल्या गेले नाही. तर देशाच्या खजिन्यापासून संरक्षण शक्ती, सैन्य दल, सगळीच वाटणी झाली. त्याचे देशावर दूरगामी परिणाम झाले आहे. देशासोबत घडलेली ही वाईट घटना होती. या वाईट घटनेचे कायम स्मरण ठेवले जावे. मात्र हे रडगाणे रडण्याचा दिवस नाही. तर असे कोणते विभाजन पुन्हा होऊ नये हा संकल्प करण्याचा, नवा एक संघ भारत बांधण्याचा हा दिवस असल्याचे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आर.विमला यांनी केले. नव्या पिढीला जुन्या संघर्षाची जाणीव व्हावी, यासाठी आजचा दिवस पाळला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे यावेळी त्यांनी आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सुजाता गंधे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत केले. यावेळी शेषराव विश्वनाथ मुरकुटे, वसंतकुमार अनंतकुमार चौरसिया, महादेव किसन कामडी, यादवराव देवगडे, गणपतराव कुंभारे या स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार करण्यात आला. तर जनभागीदारी अंतर्गत फाळणीने विस्तारीत झालेल्या खटूराम कुकरेजा, सुंगध बत्रा यांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तर शोभराज तोलाराम आहुजा, अनंतकुमार आसुदानी या विस्थापित कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. हर घर तिरंगा मध्ये कार्य करणाऱ्या ऐश्वर्या चुटे, महेश कोरे, रवी घोडेश्वार संदीप चरडे यांना ध्वज वितरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्वेता शेलगावकर यांनी केले.