मुंबई: शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने मागास भागाच्या विकासाचा ध्यास असलेला नेता आपण गमावला आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, विनायक मेटे यांनी अतिशय संघर्षातून आपले नेतृत्व सिद्ध केले होते. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची साकल्याने माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठाऊक असायचे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे. अगदी या आठवड्यातसुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.