मुंबई,:- ‘कर्तव्यदक्ष भावनेने बजावलेली सेवा ही सर्वात मोठी देशसेवा आहे. त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय स्तरावरील सन्मानदर्शक पदक जाहीर होणे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पोलीस पदक, अग्निशमन सेवा, गृह व नागरी सेवा पदक पटकावणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आज या पदक, सेवा पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ४२ जणांना पोलीस शौर्य पदक, तर तिघांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि ३९ जणांना गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील ७ अधिकारी, कर्मचारी यांना अग्निशमन पदक जाहीर झाले आहे.तसेच गृहरक्षक दलातील एकाला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी नागरी संरक्षण पदक जाहीर झाले आहे. गुन्ह्यांच्या उत्कृष्ट तपास कामासाठी राज्यातील ११ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. या सर्वच अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले असून, या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.