एक प्रख्यात लावणी सम्राज्ञीची फेसबुक वर व्हायरल झालेली क्लिप बघितली की, ज्यात ती लावणी करत असताना आयोजक तिच्याकडे जातात व महिला कलाकारास सांगतात की,तुमचे काही चाहते तुमचे नृत्य पाहण्यासाठी उंच झाडावरती शेंड्या पर्यंत चढलेले आहेत,जरा त्यांना खाली उतरायला सांगा.ते तुमचं ऐकतील. त्या कलासम्राज्ञीने तिच्या स्टाईल मध्ये सांगताच,काय आश्चर्य कुणाचाही न ऐकण्याच्या मानसिकतेतील ते तरुण अगदी नम्रपणे खाली उतरले. ही क्लिप पाहिली व मन मात्र सुन्न झाले की, कुठे चालली ही आत्ताची युवा पिढी ?
लावणी पाहण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उंच झाडावर चढून काही तरुण लावणिचा आस्वाद घेत आहे. एवढी तीव्रता,तळमळ परीक्षेचा अभ्यास करताना किंवा एखादे ध्येय प्राप्त करताना दाखवतो का हो आजचा तरुण ?
तरुणांनी कलेची कदर करावी, कलेचे कौतुक करावे,कलेला दाद ही द्यावी. पण मग प्रश्न पडतो की आजचा तरुण सामाजिक व राष्ट्रीय कार्यासाठी एवढी तळमळ,तीव्रता दाखवते का ? याचा विचार सुद्धा नक्कीच व्हायला हवा.याचा विचार यासाठी की आमची संस्काराची शिदोरी कमी पडतेय की काय ? आमचे सामाजिक भान कमी होत चालले आहे का ? तसं असेल तर येणारी पिढी कशी असेल? उद्याचा भारत कसा असेल हे आम्ही लक्षात घ्यायला पाहीजे.
एवढी तळमळ,तीव्रता तरुणपिढी रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी,स्वतः रक्तदान करण्यासाठी, स्वच्छतेचा जागर करण्यासाठी, ज्या झाडावर चढून लावणीचा आनंद घेता येतो तसेच एखादे दुसरे झाड लावून ते वाढवण्यासाठी, संवर्धनासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी,समाजा-समाजात धर्मा-धर्मात वाढलेली हिंसेची भावना नाहीशी करण्यासाठी तळमळ किंवा तत्परता दाखवतो का आजचा तरुण ? हा प्रश्न मनाला भावीविभोर करून जातो. शिक्षण हे फक्त उत्पन्नाचे साधन म्हणून न बनता शिक्षणातून सामाजिक जाणीव व सामाजिक भान जागृत झाल पाहिजे.परंतु अलीकडच्या काळात असे चित्र फारसे पाहायला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की सर्वच तरुण तसे आहेत. या देशातील काही युवा असे आहेत की, ज्यांनी आपल्या कर्तबगारीने राष्ट्राचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवला आहे. अशा तरुणांचा आपल्याला सार्थ अभिमान देखील वाटतो. पण मनमौजी व वाटेल तसं वागणाऱ्या तरुणांकडे पाहिल्यानंतर विचार करणे गरजेचे वाटते.
आज-काल सर्रासपणे महाविद्यालयीन तरुण महाविद्यालयातून बंक मारून मदिरालयात कधी जातात ते कळत नाही.हे दृश्य काही अंशी पाहायला मिळत आहे. आजकाल आपण बघतोय की अफू,चरस,गांजाचे लोन आता अगदी खेडेपाड्यापर्यंत,अगदी आदिवासी पट्ट्यात सुद्धा पोहोचलेले आपल्याला ऐकायला मिळते,वाचायला मिळते. तेजस्विता,तपस्विता व तत्परता ज्या युवा पिढीकडे असायला हवी तीच युवा पिढी आज बेभान होत चालली आहे. तर कसे चालेल ? तरुणांनो बेभान व्हा पण अभ्यासासाठी, ध्येयपूर्तीसाठी व समाजकार्यासाठी.
अहो बाप पोटाला चिमटा घेऊन, शेतात राब-राब राबून, फाटका सदरा घालून,जमेल तसा पैसा आपल्या मुलाच्या शिक्षणाला जमवतो व ही कारटी कुसंगतीमुळे महाविद्यालयात कमी मात्र विडी,सिगारेट व व गुटख्यांच्या टपरीवर जास्त पाहायला मिळतात. एवढेच नव्हे तर क्वचित प्रसंगी महाविद्यालयीन मुलींना बिनधास्तपणे सिगारेटचा झुरका मारताना पाहतो,तेव्हा मात्र मन सुन्न होते व प्रश्न पडतो काय असेल उद्याच्या भारताचे भविष्य.
पाश्चात्य संस्कृतीचा आपण एवढ अंधानुकरण केले आहे की, आपल्याला आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या नीती मूल्यांचा विसर पडत चालला आहे. ज्या युवा पिढीच्या ज्ञानाच्या व कर्तृत्वाच्या जोरावर आर्थिक महासत्तेचे स्वप्न भारत माता पाहत आहे.तीच युवापिढी मौजमजेच्या नावाखाली भरकटली,तर कसं चालेल ? तरुणांनो तारुण्याचा आनंद जरूर घ्या,पण बेभान होऊ नका. एवढं मात्र एक सुजाण नागरीक म्हणून सांगावसं वाटतं.
याच भारत वर्षाला महान विभूतींचा वारसा लाभलेला आहे.सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर माऊली,वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून त्यासाठी शपथ घेणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज,महान क्रांतिकारक भगतसिंग,सुखदेव राजगुरु, ऐन तारुण्यात हिंदू धर्माची महती अखिल विश्वाला पटवून देणारे स्वामी विवेकानंद, मुलींच्या शिक्षणाची धुरा वाहणारे फुले दांपत्य, उच्च विद्या विभूषित असताना सुद्धा राष्ट्रासाठी सर्व सुखाचा त्याग करणारे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.हा आपला गौरवशाली इतिहास.अगदी अलीकडचा विचार केला तर कल्पना चावला, सी वी रमण, डॉक्टर होमी भाभा, रामानुजन.ही अगदी अलीकडच्या काळातील गौरवशाली व्यक्तिमत्व.हा आपला वारसा.या गौरवशाली इतिहासाचा तरुण पिढीला विसर पडत चालला आहे काय ? असा प्रश्न पडतो. त्या गौरवशाली महान विभुतींच्या मार्गावर तरुणांनी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे.
प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हातपाय मोडेल त्याचं भान विसरून जसे ते तरुण झाडावर चढले. जी तीव्रता तरुणींनी तिथे दाखवली तेवढीच तीव्रता सामाजिक व राष्ट्रीय कार्यातही दाखवा ही युवापिढी ला कळकळीची विनंती. एखादं रक्तदान शिबिर घेण्यासाठी, स्वतः रक्तदान करण्यासाठी,चांगल्या कीर्तनकाराच्या किंवा वक्त्याचे विचार ऐकण्यासाठी,राष्ट्रासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी, दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी मोहिमेवर गेलेल्या पण स्वतःच शहीद झालेल्या पोलीस कुटुंबियांच्या मदतीसाठी, स्वच्छतेचा जागर करण्यासाठी, समाजात समाजातील,धर्मा धर्मातील वाढत चाललेली हिंसेची व परस्पर अविश्वासाची भावना कमी करण्यासाठी एक राष्ट्रनिष्ठ तरुण म्हणून काही योगदान देता येईल का ? यासाठी तळमळ, तत्परता दाखवा.शिका,संघटित व्हा व राष्ट्राच्या कल्याणासाठी आपले योगदान द्या. म्हणून पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की,युवकांनो बेभान व्हा पण अभ्यासासाठी, ध्येयपूर्तीसाठी व
समाजकार्यासाठी.यातच राष्ट्राचे,आपले आपल्या कुटुंबाचे हित आहे एवढं मात्र खात्रीशीर सांगतो.
नितिन वामनराव आहेर
शिक्षक/सूत्रसंचालक
मोखाडा.7767069001