प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी : राज्यपाल रमेश बैस
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
राज्यपालांच्या हस्ते प्लास्टिक उद्योगातील निर्यात पुरस्कार प्रदान
मुंबई : विसाव्या शतकात शोध लागलेली प्लास्टिक बहुगुणी वस्तू असून आज दैनंदिन जीवनापासून अनेक क्षेत्रांत प्लास्टिकचा वापर अनिवार्य झाला आहे. भारतीय प्लास्टिक उद्योगाने जगातील अनेक बाजारपेठा काबीज केल्या असून या उद्योगाने संशोधन, नाविन्यता व उत्कृष्टतेच्या माध्यमातून ‘ब्रँड इंडिया’ निर्माण करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे देण्यात येणारे ‘प्लास्टिक निर्यात उत्कृष्टता पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7 जून) नेसको, गोरेगाव मुंबई येथे प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सुप्रीम इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एम. पी. तापडिया, यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. कौन्सिलचे माजी अध्यक्ष अरविंद गोयंका यांना विशेष सन्मान देण्यात आला. एकूण 75 प्लास्टिक निर्यातदारांना पुरस्कार’ देण्यात आले.
मध्य पूर्वेतील युद्धजन्य स्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी होत असताना भारताची अर्थव्यवस्था तेजीने वाढत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. प्लास्टिक उद्योग 50 लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देत असल्याचे नमूद करून प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने राज्यातील विविध विद्यापीठांशी सहकार्य स्थापित करावे तसेच विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील उद्योग आणि रोजगाराच्या संधींबद्दल अवगत करावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
जगातील अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारताचा संशोधन आणि नावीन्यतेवरील खर्च खूपच कमी आहे असे सांगून प्लास्टिक उद्योगाने संशोधन आणि नवनिर्मितीवर अधिक भर द्यावा, असे राज्यपालांनी सांगितले.
प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी तसेच प्लास्टिकचा पुनर्वापर आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष हेमंत मिनोचा, उपाध्यक्ष विक्रम भादुरिया व कार्यकारी संचालक श्रीबाश दासमोहपात्रा, प्लास्टिक क्षेत्रातील उद्योजक, आंतरराष्ट्रीय खरीददार व निर्यातदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.