मुंबई : शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
मुंबईतील खार येथील रामकृष्ण मठ व मिशनच्या वर्षभर चाललेल्या शताब्दी वर्षाची सांगता आज बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला रामकृष्ण मिशन बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी दिव्यानंद, सहायक सचिव बलभद्रानंद, मुंबई रामकृष्ण मठाचे अध्यक्ष सत्यदेवानंद, सुशीम दत्ता, शंतनू चौधरी तसेच रामकृष्ण मठाच्या विविध केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद महिला सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबई केंद्राने गरीब व वंचित महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.
रामकृष्ण मिशन ही आत्मोद्धारासोबत लोकहिताचे सामाजिक कार्य करीत असल्याबद्दल मिशनचे अभिनंदन करून मिशनने भारतातील युवकांसाठी कौशल्य विकास, क्रीडा विकास व समग्र व्यक्तिमत्व विकासासंबंधी उपक्रम राबवावे. तसेच वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सशक्तीकरणाची योजना राबवावी, असे ही त्यांनी सांगितले.
विविध आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेले ‘माँ शारदा भवन’ निर्माण केल्याबद्दल मिशनचे कौतुक करून रामकृष्ण मिशनतर्फे ठाणे येथे नवे केंद्र सुरु करण्यात येत असल्याबद्दल राज्यपाल श्री. बैस यांनी आनंद व्यक्त केला.