नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
महाबळेश्वर येथे राज्यपालांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक
सातारा : प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नवनवीन संकल्पना राबवून राज्याच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
महाबळेश्वर येथे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज्यपाल यांच्या सहसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे ,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प, उपक्रम यांचा सखोल आढावा घेत असताना राज्यपाल श्री. बैस यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यटन विकास, बांबू लागवड अदीविषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास यासाठी राबविण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूल या उपक्रमाबाबत माहिती घेत असताना श्री. बैस यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची वर्गवारी ही उपलब्ध पायाभूत सुविधांच्या आधारे करत असतानाच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारेही करावी. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करावे. त्यासाठी शाळांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. ज्या शाळा चांगली कामगिरी करतील त्यांना शासनामार्फत पुरस्कार देण्यात यावेत, असे सांगितले.
या उपक्रमाबाबत बारकाईने जाणून घेत असताना त्यांनी मॉडेल स्कूलच्या निर्मितीसाठी येणारा खर्च, जिल्ह्यातील एक शिक्षकी शाळांची संख्या, शाळांमध्ये प्रयोगशाळा, संगणक लॅबची उपलब्धता आदींबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचा दर्जा तपासणी नियमितपणे व्हावी व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे मध्यान्ह भोजन मिळेल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सध्याच्या काळात मुलांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. मैदानी खेळांमधील सहभाग कमी झाला आहे. त्यामुळे शाळांमध्ये मुलांच्या क्रीडा विकासावर जाणीवपूर्वक भर देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एकात्मिक धार्मिक, ऐतिहासिक, पर्यावरण पूरक पर्यटन विकास आराखडा राबविण्यात येत असून यामधून किल्ल्यांचा विकास करत असताना अर्काइव्हलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची मदत घेण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल श्री. बैस यांनी केली. जिल्ह्यातील प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत असलेल्या बांबू लागवडीचा आढावा घेत असताना श्री. बैस म्हणाले, बाजारपेठेच्या दृष्टीने किफायतशीर ठरणाऱ्या बांबूच्या प्रजातींची लागवड करावी. बांबूपासून असंख्य प्रकारच्या वस्तू तयार करण्यात येतात. याचे व्यावसायिक प्रशिक्षण स्थानिकांना देऊन त्यांचा उत्पन्न स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना फळ रोपे, शेवगा यासारखी रोपे मोफत उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांनी या रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे व त्यापासून मिळणारे उत्पन्न हे शेतकऱ्यांनाच देण्यात यावे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी उजाड माळराने आहेत. त्या ठिकाणी अशाप्रकारे वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.
जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर दगड उपलब्ध आहेत अशा वेळी एखादी अंगणवाडी संपूर्णतः दगडी बांधकामाची अशी तयार करण्यात यावी. जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर टसर सिल्क प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना सिल्क धागा तयार करण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यात यावे. बांबूपासूनही धागा तयार करण्याच्या दृष्टीने प्रकल्प राबवावेत, अशा सूचना राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्याचा संपूर्ण आढावा सादर केला. यामध्ये जिल्ह्यात राबविण्यात येत असणारा मॉडेल स्कूल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच स्मार्ट पीएचसी ,जिल्ह्याचा एकात्मिक धार्मिक, ऐतिहासिक, पर्यावरण पूरक पर्यटन विकास आराखडा, बांबू लागवड उपक्रम, अभिनव अंगणवाडी, टसर सिल्क उत्पादन प्रकल्प, आदींबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.