दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सुविधा उपलब्ध
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
सक्षम ॲपवर नोंदणी करून मागणी नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा मिळविण्यासाठी आवश्यक असलेली मागणी सक्षम ॲपवर नोंदवावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना संबधित सुविधा पुरविणाऱ्या शासकीय व स्थान निश्चिती यंत्रणेला दिव्यांग व वयोवृध्द मतदारांच्या मागणीनुसार आवश्यक मदत म्हणजेच गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे श्री. यादव यांनी सांगितले. मतदानाच्या दिवसापर्यंत सक्षम ॲपवर दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना मागणी नोंदविता येणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदविण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.
मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची जोरदार तयारी सुरू आहे.
दिव्यांग व ज्येष्ठांना ‘सक्षम’चे सहाय्य
दिव्यांग आणि वयोवृध्द मतदारांना (८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक) मतदान करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, असे सक्षम मोबाईल ॲप भारत निवडणूक आयोगाने तयार केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम हे विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघास जोडलेले आहेत. तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघास वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा हे विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत.
हेल्पलाईन व व्हिडीओ कॉल सुविधा
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडून १९५० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आला असून ०२२-२४१८३१४४ / ७०३९२९७१९७ हे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या भ्रमणध्वनी क्रमांकावर कर्णबधीर मतदारांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधण्यासाठी व्हिडिओ कॉल सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागातील दिव्यांग मतदार सुविधेसाठीचे नोडल अधिकारी सुनिता मते यांनी दिली.
मतदान केंद्रांवरही सुविधा
भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरही दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगांमध्ये बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आवश्यकतेनुसार व्हिलचेअर, सहाय्यक स्वयंसेवक विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे.
मेडिकल किट, माहितीचे फलक, कर्णबधिरांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधणारे स्वयंसेवक, दृश्य माहिती, ब्रेललिपीतील सूचना आदी सुविधा देण्यात येणार आहेत. अंध मतदारांना ब्रेललिपीतील मतदार स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सर्व मतदान केंद्रावर अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीतील डमी मतदानपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदार/वृद्ध मतदार व त्यांच्या सहाय्यकास मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता व्हिलचेअर फ्रेंडली वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.