प्रामाणिकतेने कार्य केल्यास यश नक्कीच लाभेल : पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
महाराष्ट्र परिचय केंद्रास सदिच्छा भेट
नवी दिल्ली : “प्रामाणिकतेने तसेच कठोर परिश्रमपूर्वक काम केल्यास त्या कामाला नक्कीच यश मिळेल”, असे प्रेरणादायी मार्गदर्शन पद्मश्री पुरस्कार घोषित, अनाथ मुलांचे नाथ आणि थोर समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी काल महाराष्ट्र परिचय केंद्राला भेटी दरम्यान केले.
आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ.पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. पापळकर यांच्यासोबत त्यांच्या मानसकन्या गांधारी आणि मानसपुत्र योगश दिल्लीत आले असून या सोहळ्यात उपस्थित राहतील.
पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, डॉ. पापळकर यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. यावेळी डॉ.पापळकर यांचे स्वागत उपसंचालक (माहिती) श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी त्यांचे सोबत सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, श्री नितीन पाटील, संपादक- रोजगार नोकरी संदर्भ संजय नाथे, अनाम प्रेम संस्थेचे सदस्य प्रशांत भाट, मानसकन्या गांधारी आणि मानसपुत्र योगश यांचेही स्वागत श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
डॉ. पापळकर यांनी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अत्यंत आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. “हा पुरस्कार मला नाही तर अनाथ मुलांना मिळाला आहे,” तसेच “या मुलांसाठी काम करणे हे माझे जीवन आहे आणि मी माझ्या आयुष्याचा शेवटपर्यंत हे कार्य करत राहीन,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. पापळकर यांनी समाजसेवेतील त्यांच्या कार्याबद्दल आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देतांना सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील परतवड्यात 14 फेब्रुवारी 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. धोब्याचा व्यवसाय पासून ते पत्रकारिता केल्यापासून ते रस्त्यावरच्या अनाथ, अपंग, गतिमंद आणि दिव्यांग मुलांच्या वेदनांनी त्रस्त झाल्याचे त्यांनी त्यांचा जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. वंचित घटकांसाठी संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, 1990 च्या दशकात त्यांनी वझ्झर या गावात “स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह” नावाचा आश्रम स्थापन केला. या आश्रमात अपंग, बेवारस, गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून ते भारतात एक रोल मॉडेल बनले आहे.
शासकीय कुठलेही अनुदान न घेता हा आश्रम सुरू आहे. समाजाकडून मिळणाऱ्या दानावर आणि शेगाव संस्थान आणि अंबादास पंथ बालगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर हा आश्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलांना स्वावलंबी बनवणे हे त्यांचे ध्येय असल्याचे सांगत, या मुलांना त्यांचे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.
आश्रम सुरू झाल्यानंतर 200 मूले आश्रमात होती, असे सांगत, आश्रमातल्या 30 मूकबधिर-गतिमंद मुलामुलींचे लग्न लावल्याचे त्यांनी माहिती दिली. आतापर्यंत आश्रमातील 12 जण शासकीय सेवेत रुजू झाले आहेत आणि यासोबत त्यांना जगण्याचा अधिकार मिळाल्याचे सांगत, त्यांनी आनंद व्यक्त केला. सद्या त्यांच्या आश्रमात 98 मुली व 25 मुले अशी एकूण 123 मुले वास्तव्यास असून, डॉ. पापळकर त्यांचे संगोपन व शिक्षणापासून ते पुनर्वसन करीत असल्याचेही त्यांनी सांगतिले. तसेच आश्रमात डॉ पापळकर यांनी मुलांच्या सहायाने 15000 वृक्ष लावून वनराई फुलविली आहे.
बेवारस आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनावर त्यांनी लक्ष केंद्रित करत, दिव्यांगांच्या पुनर्वसनाबाबत यावेळी चिंताही व्यक्ती केली. शासकीय कायद्यानुसार 18 वर्षावरील मुलांना रिमांड मधून काढून टाकले जाते, याची खंत व्यक्त करत, 18 वर्षांपर्यंत ठेवणा-या रिमांड होम च्या कायद्यात आवश्यक बदल घडवून अशा मुलांसाठी संगोपन तसेच पुनर्वसनासाठी पाऊले उचलण्याची त्यांनी यावेळी इच्छा व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग, मतिमंद, मुकबधीर, दृष्टीहीन आणि निराश्रित मुलांना आश्रय देऊन त्यांच्या संगोपनाची अतिशय कठीण जबाबदारी डॉ.पापळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. या अतुलनीय कार्याची भारत सरकारने दखल घेऊन आज दि. 09 मे रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.