माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अधिकारी–कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
प्रशिक्षणामुळे पूर्ण कार्यक्षमतेचा उपयोग होऊन प्रभावी काम करण्यास मदत – स्वाधिन क्षत्रिय
मुंबई : शासकीय सेवेत काम करीत असताना नागरिककेंद्री काम करावे लागते. समाजाप्रती जबाबदार राहून शासनात आल्यानंतर मिळालेली भूमिका पार पाडावी लागते. अशावेळी संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कामासंदर्भातील प्रशिक्षण मिळाले पाहिजे. प्रशिक्षणामुळे पूर्ण कार्यक्षमतेचा उपयोग होऊन प्रभावी काम करण्यास मदत मिळते, असे मत भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी आज व्यक्त केले.
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेद्वारा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ परिषद सभागृह, मंत्रालय येथे करण्यात आला. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ. ह. भोसले, विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव सत्यबीर दोड, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, सेवानिवृत्त अवर सचिव आशिष लोपीस उपस्थित होते.
भारतीय लोकप्रशासन संस्था ही प्रशिक्षणाची गरज बघून प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करीत असल्याचे सांगत श्री. क्षत्रिय म्हणाले, ही संस्था अखिल भारतीय स्तरावरील आहे. संस्थेच्यावतीने नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या उपयोगाने कामकाज गतिमान, प्रभावी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात येते. प्रशिक्षणाची गरज भागविण्यासाठी संस्थेमार्फत यशवंतराव चव्हाण व बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालांचे आयोजनही करण्यात येते. नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पारितोषिकासाठी संस्थेकडे पाठविण्याचे व व्याख्यानमालांचा उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले, कामकाजाच्या गतिमानतेसाठी आणि काळानुरूप कामकाजात सुधारणा होण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. प्रशिक्षणामुळे संबंधित नियम, कायदे अथवा संबंधित कामकाजाबाबतच्या झालेल्या बदलांचे ज्ञान मिळाल्यामुळे काम करताना संबंधित अधिकारी- कर्मचारी आत्मविश्वासाने सामोरे जातो. निर्णय घेताना अशा प्रशिक्षणाची निश्चितच मदत होते. शासनाचे काम हे नियम, कायदे यांना अनुसरून चालत असते. त्यामुळे प्रशिक्षणांचे आयोजन विशिष्ट कालावधीनंतर करण्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री. दोड यांनी प्रशासकीय कामकाजातील नियम, कायदे याबाबत विचार व्यक्त केले. संचालक हेमराज बागूल यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची गरज स्पष्ट केली. अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी प्रशिक्षणामुळे अधिक सक्षमतेने पार पाडण्यास मदत होईल. प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग करून आपले काम प्रभावीपणे करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमात वर्तणूक, शिस्त व अपिल नियम, विभागीय चौकशी या विषयांबाबत वक्ते आशिष लोपीस यांनी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण सत्राला सुरूवात केली. या प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.