मुंबई, दि. 16: मुले ही देशाचे भविष्य आहेत असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांचा वर्तमान सुरक्षित असेल तरच भविष्य उज्वल होईल. मुलांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने आपला विभाग बाल कल्याण समितीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम करतो. मुलांवर अत्याचार होणार नाही व प्रत्येक मुलास त्याचा हक्क उपभोगता येईल याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. मुलांना न्याय देण्यात विलंब होणे योग्य नाही, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण करायला हवेत, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर असे मत व्यक्त केले.
मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष, सदस्य व बाल न्याय मंडळाचे सदस्य यांच्या समवेत दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल महिवाल, बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव उदय जाधव, महिला व बालविकास विभागांचे विभागीय उप आयुक्त, विभागाचे अधिकारी तसेच सर्व नवनियुक्त जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य सभेसाठी उपस्थित होते