राज्यपालांच्या हस्ते ‘मर्चंट नेव्ही’ सप्ताहाचे उद्घाटन
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
सागरी प्रशिक्षण संस्थांनी पारंपरिक विद्यापीठांशी सहकार्य करावे : राज्यपाल रमेश बैस
दि. 30 : जगाचा नव्वद टक्के व्यापार सागरी वाहतुकीच्या माध्यमातून होतो. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. देशाला जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यात सागरी व्यापाराचे योगदान मोठे आहे. सागरी प्रशिक्षण संस्था व पारंपरिक विद्यापीठांमध्ये नियमित देवाण-घेवाण झाल्यास या क्षेत्रातील रोजगारांच्या संधींबाबत युवकांना माहिती मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 61 व्या राष्ट्रीय सागरी दिवस (नॅशनल मेरीटाईम डे) तसेच सागरी सप्ताहाचे (मर्चंट नेव्ही वीक) शनिवारी राजभवन येथे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
भारत आज तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे मार्गक्रमण करीत आहे. देशातील सशक्त लोकशाहीमुळे अनेक देश भारताशी व्यापारी संबंध वाढविण्याबाबत उत्सुक आहे. या दृष्टीने सागरी व्यापार क्षेत्र यापुढे देखील आपले योगदान देईल, अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली. सागरी मार्गाने प्रवासी वाहतुकीला चालना देण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
समुद्री व्यापार क्षेत्रातील एकूण कार्यबलामध्ये महिलांची संख्या लक्षणीय वाढत असून आज 4563 महिला नाविक या क्षेत्रात कार्य करीत असल्याची माहिती नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी यावेळी दिली. या क्षेत्रात मोठ्या संख्येने महिलांनी यावे या दृष्टीने महिला नाविक सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सागरी सप्ताहाचे बोधवाक्य ‘सातत्यपूर्ण नौवहन : आव्हाने व संधी’ हे असल्याचे त्यांनी सांगितले.सुरुवातीला महासंचालक जगन्नाथन यांनी राज्यपालांच्या पोषाखाला मर्चंट नेव्हीचे बोधचिन्ह लावले.
कार्यक्रमाला शिपिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कॅप्टन बी के त्यागी, नॅशनल मेरीटाईम डे सेलिब्रेशन समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, उपमहासंचालक डॉ पांडुरंग राऊत, शिप सर्व्हेयर अनिरुद्ध चाकी, नॉटिकल सर्व्हेयर कॅप्टन मनीष कुमार, शिपिंग मास्तर मुकुल दत्ता व इतर अधिकारी तसेच जहाज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.